शाकिबवर अटकेची टांगती तलवार, मर्डर केसमुळे करियर `खल्लास`, कॅप्टन शांतो म्हणतो...
Pakistan Vs Bangladesh 2nd Test : पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीपूर्वी शाकिबला वाचवण्यासाठी खेळाडू मैदानात उतरले आहेत.
Najmul Shanto On Shakib Murder Case : सध्या पाकिस्तान आणि बांगलादेश (PAK vs BAN) यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे. पहिल्या कसोटीमध्ये बांगलादेशने विजय मिळवून पाकिस्तानचा धुव्वा उडवला होता. मात्र, या सामन्यानंतर बांगलादेशचा माजी कॅप्टन आणि स्टार खेळाडू शाकिब अल हसन याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाकिबसोबतच अभिनेता फिरदौस अहमद यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे शाकिब आगामी सामन्यात खेळणार की नाही? असा सवाल विचारला जातोय. त्यावरून आता बांगलादेशची टीम एकजुटीने शाकिबसाठी लढताना दिसत आहे.
नजमुल हुसेन शांतो म्हणतो...
शाकिब ही आपल्या देशाची मोठी संपत्ती आहे. गेल्या 17 वर्षांपासून त्यांनी बांगलादेशचं नाव उंचावलं आहे. शाकिब भाईविरुद्ध असा खटला अनपेक्षित आहे. नवीन बांगलादेश, आम्हाला सर्व काही नवीन पहायचं आहे. आशा आहे की सर्व अंधार दूर होईल, नवीन प्रकाश येईल, अशी पोस्ट नजमुल हुसेन शांतो याने केली आहे.
काय म्हणाला मुशफिकुर रहीम?
शाकिबसारख्या चॅम्पियनसोबत खेळण्याचा मला अभिमान आहे, हे मी पुन्हा एकदा सांगेन. त्यांच्या कठीण काळात मी त्यांच्यासोबत असेन. त्यांच्यावर लावण्यात आलेल्या खोट्या आरोपांचे मी समर्थन करणार नाही. मला माहित आहे की तो कधीही अमानवी कृत्य करू शकत नाही, असं म्हणत मुशफिकुर रहीमने शाकिबला खंबित साथ दिलीये.
नेमकं प्रकरण काय?
बांगलादेशमधील आंदोलनकर्ता रुबेल याच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये शाकीब अल हसन याच्या अडचणी वाढू शकतात. रुबेलने 5 ऑगस्ट रोजी अडबोरमधील रिंगरोडवर निषेध मोर्चात भाग घेतला होता. त्यावेळी रुबेलच्या छातीत आणि पोटात गोळी लागली. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, परंतु 7 ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात तब्बल 500 अज्ञात लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शाकीब अल हसनचा देखील समावेश आहे.
दरम्यान, शाकिबवर हत्येचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला क्रिकेट संघातून वगळावं, अशी नोटीस बांगलादेश क्रिकेट बोर्डाला आली होती. त्यावर आम्ही पाकिस्तानविरुद्धची कसोटी संपल्यानंतर निर्णय घेऊ, असं क्रिकेट बोर्डाने सांगितलं होतं. आता दुसऱ्या कसोटीपूर्वी शाकिबवर क्रिकेट बोर्ड काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.