कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : त्याने खो खो मध्ये महाराष्ट्राला पदकं मिळवून दिली... राष्ट्रीय पातळीवरही आपल्या खेळाच्या जोरावर नावं कमवलं... कितीतरी पारितोषिके, पुरस्कार त्याने मिळवले... पण, नोकरी नसल्याने त्याला आज चहाचा गाडा चालवावा लागतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इथली चहाची टपरी पाहिल्यावर तुम्हाला तसं काही विशेष वाटणार नाही. पण, ही चहाची टपरी महाराष्ट्राच्या खो खो संघाचं कर्णधारपद सांभाळलेल्या खेळाडूची आहे हे सांगितलं तर? होय हे खरं आहे... पिंपरी चिंचवडच्या कासारवाडी भागात राहणार अंजुनिया तायप्पा भंडारी... त्याने २००८ मध्ये खोखोचे कर्णधारपद भूषवत कांस्य पदकाची कमाई केली होती. त्यानंतर सलग तीन वर्ष नॅशनल ऑल इंडिया टूर्नामेंटमध्ये त्याच्या संघाने विजेतेपद पटकावलं. आता तो पुणे नवमहाराष्ट्र संघाकडून खेळतोय. नुकत्याच म्हैसूर इथं झालेल्या स्पर्धेत कांस्य पदक पटकावले. पण आज त्याच्यावर चहा विकण्याची वेळ आलीय. 


अंजुनियाला नोकरीची नितांत गरज आहे. त्यासाठी तो अनेक ठिकाणी प्रयत्न करतोय पण नोकरी मिळत नाहीय. अर्थात खोखोला इतर खेळांप्रमाणे ग्लॅमर नाही. पण तरीही या खेळावर त्याची निस्सीम श्रद्धा आहे. मात्र ग्लॅमर नसल्यामुळे आज नोकरी नाही, पैसा नाही त्यामुळे चहा विकण्याची खेळ या राष्ट्रीय खेळाडूवर आलीय.