गांगुलीच्या `दादा`गिरीला १५ वर्ष, कैफचा भावनिक मेसेज
भारताच्या नॅटवेस्ट सीरिजमधल्या ऐतिहासिक फायनल विजयाला आज १५ वर्ष पूर्ण झाली आहेत.
मुंबई : भारताच्या नॅटवेस्ट सीरिजमधल्या ऐतिहासिक फायनल विजयाला आज १५ वर्ष पूर्ण झाली आहेत. युवराज सिंग आणि मोहम्मद कैफच्या अफलातून खेळीमुळे भारतानं अशक्य वाटणारं असं आव्हान पार केलं. युवराज आणि कैफबरोबरच तेव्हाचा भारताचा कॅप्टन सौरव गांगुलीनं केलेलं विजयाचं सेलिब्रेशन प्रत्येक भारतीय क्रिकेटरसिकाच्या कायमच लक्षात राहिलं.
इंग्लंडचा ऑल राऊंडर अन्ड्रू फ्लिंटॉफला प्रत्युत्तर देण्यासाठी सौरव गांगुलीनं लॉर्ड्सच्या पॅव्हेलियनमध्ये जर्सी काढून विजयी सेलिब्रेशन केलं. या ऐतिहासिक घटनेला १५ वर्ष पूर्ण झाल्यावर भारताच्या विजयाचा शिल्पकार मोहम्मद कैफनं एक भावनिक मेसेज ट्विटरवर शेअर केला आहे. १५ वर्षांपूर्वी याच दिवशी मी एक स्वप्न जगलो. आयुष्यभराचं ते स्वप्न होतं. ३२६ रन्सचा पाठलाग करताना आपण इंग्लंडविरुद्ध जिंकलो, असं कैफ म्हणाला आहे.
नॅटवेस्ट सीरिजच्या फायनलमध्ये इंग्लंडनं ठेवलेल्या ३२६ रन्सचा पाठलाग करताना सौरव गांगुली(६०) आणि वीरेंद्र सेहवागनं(४५) भारताला १०३ रन्सची ओपनिंग पार्टनरशीप करून दिली. पण त्यानंतर झालेल्या पडझडीमुळे भारताची अवस्था १४६/५ अशी झाली. पण मोहम्मद कैफच्या नाबाद ८७ रन्स आणि युवराज सिंगच्या ६९ रन्समुळे भारतानं लॉर्ड्सच्या मैदानात इतिहास घडवला.