मुंबई : आयपीएलच्या अकराव्या मोसमाला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. प्रत्येक क्रिकेट रसिक त्यांच्या आवडत्या टीमला सपोर्ट करताना दिसत आहे. पण आयपीएलमधल्या राजस्थानच्या टीमला तर चक्क शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सपोर्ट करत आहे. हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेमुळे राजस्थानच्या टीमचा फायदा झाला आहे. संपूर्ण राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसनं हल्लाबोल आंदोलन केलं. या आंदोलनाची ट्विट करताना राष्ट्रवादीनं हॅशटॅग हल्लाबोल #Hallabol चालवला. पण #Hallabol वापरल्यानंतर राजस्थानच्या टीमचा लोगो राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांनी केलेल्या ट्विटवर दिसून येत आहे.


कसा आला राजस्थानचा लोगो?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलच्या कोणत्याही टीमला टॅग केल्यानंतर किंवा त्या टीमची टॅगलाईन हॅशटॅगला वापरल्यानंतर ट्विटरवर टीमचा लोगो येतो. याचमुळे राष्ट्रवादी काँग्रेसनं वापरलेल्या हल्लाबोल हॅशटॅगमुळे राजस्थानच्या टीमचा लोगो दिसत आहे.


'हल्लाबोल'चा राजस्थानला फायदा


महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसनं हल्लाबोल आंदोलन केलं. या आंदोलनाचा राष्ट्रवादीला किती फायदा होईल हे पुढच्या निवडणुकांमध्ये कळेल. पण सध्या तरी राष्ट्रवादीनं हल्लाबोल हॅशटॅग वापरून राजस्थानच्या टीमला ट्विटरवर ट्रेडिंग राहण्यात मदत केली आहे, असंच म्हणावं लागेल.