भारताचा भालाफेकपटू गोल्डन बॉय नीरज चोप्राने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचं नाव उंचावलं आहे. टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये पार पडलेल्या वर्ल्डकप फायनलला हजेरी लावली होती. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या या सामन्याला नीरज चोप्रासह अनेक दिग्गज खेळाडू तसंच सेलिब्रिटी हजर होते. पण टीव्हीवर नीरज चोप्रा वगळता इतर सर्व सेलिब्रिटींना दाखवण्यात आलं होतं. दरम्यान नुकतंच इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्याला याबद्दल विचारण्यात आलं. पण नीरज चोप्राला या प्रश्नामुळे काही फरक पडला नाही आणि त्याने योग्य उत्तर दिलं. कॅमेरा मला दाखवत नसल्याचा मी अजिबात विचार करत नव्हतो. याउलट त्याने प्रसारकांना डायमंड लीगसारख्या स्पर्धा योग्य पद्धतीने दाखवण्याची विनंती केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"जेव्हा मी स्पर्धेत सहभागी असेन तेव्हा त्यांनी दाखवावं. जेव्हा मी डायमंड लीगमध्ये सहभागी असतो तेव्हा ते योग्यप्रकारे दाखवत नाहीत. हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यावेळी ते फक्त हायलाइट्स दाखवतात. मी अहमदाबादला फक्त सामना पाहण्यासाठी गेलो होतो आणि मी त्याचा फार आनंद लुटला," असं नीरज चोप्रा म्हणाला आहे.


"जर भारत जिंकला असता तर मला नक्कीच आणखी आनंद झाला असता. पण मी स्टँडमध्ये चांगला वेळ घालवला. कॅमेरा माझ्याकडे वळावा अशी माझी अजिबात इच्छा नव्हती. तो विचारही माझ्या डोक्यात आला नाही," असं नीरज चोप्राने स्पष्टच सांगितलं.


दरम्यान नीरज चोप्राने या मुलाखतीत खासगी आयुष्याबद्दल अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. आवडता क्रीडा चित्रपट ते जर खेळाडू नसता तर काय केलं असतं यांचा उलगडा त्याने केला. 


नीरज चोप्राने यावेळी सांगितलं की, जेव्हा क्रिकेट खेळण्याची वेळ येते तेव्हा मी फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही गोष्टी करु शकतो. यामुळेच मी गोलंदाजी करत असल्याप्रमाणे भाला फेकणं पसंत करतो. 'मी फलंदाजी चांगली कतो. जर सांगितलं तर चांगली गोलंदाजीही करु शकतो,' असं नीरज चोप्रा म्हणाला आहे. 


नीरज म्हणाला की, त्याचा आदर्श भालाफेकपटू जॅन झेलेझनी आहे, ज्याचा शिस्तीत विश्वविक्रम आहे. तो झेक प्रजासत्ताकचा खेळाडू आहे ज्याने पुरुषांच्या भालाफेकमध्ये 98.48 मीटरसह सर्वोत्कृष्ट भालाफेकीचा विक्रम केला आहे. तो जागतिक आणि ऑलिम्पिक चॅम्पियन देखील आहे.