`लोक फक्त म्हणायचे की...` सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राची पहिली प्रतिक्रिया
Neeraj Chopra In WAC 2023: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. अंतिम फेरीतील दुसऱ्या प्रयत्नात त्याने 88.17 मीटर अंतर पार करून पदक जिंकले आहे.
World Athletics Championships: ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने आता जागतिक चॅम्पियनशिपमध्येही इतिहास रचला आहे. भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकमध्ये (javelin) सुवर्णपदक पटकावले आहे. अंतिम फेरीत त्याने 88.17 मीटर भाला फेकत सुवर्ण पदक मिळवलं आहे. ही स्पर्धा 1983 पासून आयोजित केली जात असून 40 वर्षात पहिल्यांदाच भारतीय खेळाडूने सुवर्णपदक जिंकले आहे. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 87.82 मीटर भाला फेकत रौप्यपदक जिंकले. या सुवर्ण कामगिरीनंतर नीरज चोप्रावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सुवर्णपदक मिळवल्यानंतर नीरज चोप्राने महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
हे ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राने हृदयस्पर्शी अशी प्रतिक्रिया दिली आहे. 'आता काय सांगू, सगळे फक्त एवढंच म्हणायचे की, हेच पदक (वर्ल्ड चॅम्पियनशिपमधलं सुवर्ण) बाकी आहे. पण तेही आज पूर्ण झालंय. फक्त 90 मीटरच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं राहिलं आहे, आज होईल असं वाटत होतं, पण सुवर्णपदक जास्त महत्त्वाचं होतं. आता आपल्याकडे हे आहे. आता स्पर्धा आणखी कठीण आहे. वेळ पडल्यास त्याच्यावर अधिक मेहनत घेईन, असे नीरजने म्हटलं आहे.
थ्रो दरम्यान, मांडीच्या दुखापतीचा विचार नीरजच्या मनात चालू होता. ज्यामुळे तो ट्रॅकवर त्याचे 100 टक्के देऊ शकला नाही. "मला आत्ताच वाटत होतं की शेवटचा थ्रो असेल. थ्रो सातत्यपूर्ण होतं पण कुठेतरी काही समस्या होती. मी विचार करत होतो की मी पहिली थ्रो खूप चांगला करेन. पण त्यात एक तांत्रिक समस्या होती. जर पहिला थ्रो चांगला गेला नाही, तो थोडेसे निराश वाटतेच. मग मी स्वतःला सावरलं. मी दुखापतीचा थोडासा विचार करत होतो. मी अधिक काळजीपूर्वक पुढे जात होतो. मला 100 टक्के वेगाने जाता येत नव्हते. जर वेग चांगला नसेल तर कमतरता येते. त्यामुळे मला पूर्णपणे तंदुरुस्त राहावे लागेल आणि धावपळीत 100 टक्के वेगाने धावावे लागेल आणि त्यासाठी माझे सर्वस्व द्यावे लागेल. मला तेच करायचे आहे," असे नीरज म्हणाला.
भारतीयांचे मानले आभार
"मी भारतातील लोकांचे आभार मानू इच्छितो की तुम्ही रात्री जागे राहून मला पाठिंबा दिला. खूप खूप धन्यवाद. हे पदक संपूर्ण भारतासाठी आहे. ऑलिम्पिक चॅम्पियन बनलो होतो आणि आता वर्ल्ड चॅम्पियन झालो आहे. आपण काहीही करू शकतो, तुम्ही सर्वजण असेच आपापल्या क्षेत्रात मेहनत करत राहा आणि आम्हाला जगात नाव कमवायचे आहे," असाही संदेश नीरजने भारतीयांना दिला आहे.