Turning Point of T20 WC Final : आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) फायनल सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने साऊथ अफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून टी-ट्वेंटी विश्वचषकावर नाव कोरलं आहे. तब्बल 17 वर्षानंतर टीम इंडिया विश्वविजेती बनली आहे. त्यामुळे आता संपूर्ण भारतात दिवाळी साजरी केली जातीये. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी केलेल्या अफलातून कामगिरीमुळे वर्ल्ड कप जिंकता आलाय. मात्र, रोहित शर्माचा एक निर्णय सर्वात निर्णायक ठरला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालं असं की, टीम इंडिया विजयाच्या मार्गावर होती. मात्र, हेन्रिक क्लासेनने दांडपट्टा चालवला अन् टीम इंडियाच्या हातातून विजय निसटू लागला. क्लासेनने अक्षर पटेलला चोप दिला अन् त्याच्या 15 व्या ओव्हरमध्ये तब्बल 24 धावा कुटल्या. त्यात त्याने दोन फोर आणि दोन सिक्स मारले. त्यामुळे आता सामना रोमांचक स्थितीत आला होता. साऊथ अफ्रिकेला 30 बॉलमध्ये 32 धावांची गरज असताना रोहित शर्माने बुमराहला ओव्हर दिली. त्यात बुमराहने केवळ 4 धावा दिल्या. त्यामुळे सामन्यात संतुलन आलं. भारताला विजय मिळवायचा असेल तर क्लासेनची विकेट महत्त्वाची होती.


रोहितने एक मोठा निर्णय घेतला. रोहितने आपला हुकमी एक्का म्हणजे हार्दिक पांड्याला गोलंदाजीला बोलवलं. तिथं कमी तिथं आम्ही अशी भूमिका पांड्याने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये बजावली आहे. त्यामुळे रोहितने पांड्याला ओव्हर दिली अन् पांड्याने पहिल्याच बॉलवर क्लासेनला तंबूत पाठवलं. क्लासेनची विकेट गेली अन् रोहितने सुटकेचा श्वास घेतला.


अखेरच्या ओव्हरमध्ये देखील जेव्हा टीम इंडियाला 16 धावा रोखायच्या होत्या. तेव्हा पांड्याने केवळ 6 धावा दिल्या अन् सामना टीम इंडियाच्या बाजूने झुकवला. हार्दिक पांड्याने 3 ओव्हरमध्ये केवळ 20 धावा देत 3 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. त्यामुळे खऱ्या अर्थाने पांड्या मॅचविनर ठरला आहे.


दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शामसी.


भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.