दक्षिण आफ्रिका दौरा मध्येच सोडून मायदेशी परतला हा संघ, क्रिकेट विश्वात खळबळ
नेदरलँड क्रिकेट संघाने कोरोनाव्हायरसच्या नवीन प्रकारांचा धोका लक्षात घेता, मालिकेच्या मध्यभागी आपल्या सर्व खेळाडूंना सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे.
SA vs NED : कोरोना व्हायरसचा नवा प्रकार समोर आल्यानंतर नेदरलँड क्रिकेट संघाने मोठा निर्णय घेतला आहे. डच बोर्डाने दक्षिण आफ्रिका दौरा रद्द केला. यासोबतच त्यांनी आपल्या संघाला दौऱ्यातून मायदेशी परत आणण्याचा निर्णय घेतला.
शुक्रवारी नेदरलँड्स आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सेंच्युरियन येथील सुपर स्पोर्ट्स पार्कवर मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना खेळला जात होता. यजमानांनी प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 8 गडी गमावून 277 धावा केल्या. प्रत्युत्तरात डच संघाने 2 षटकांत एकही विकेट न गमावता 11 धावा केल्या. त्यानंतर पाऊस सुरू झाला आणि सामना थांबवण्यात आला.
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवल्या
यूरोपच्या अनेक भागांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोनाचा हा संसर्ग रोखण्यासाठी काही देशांनी पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रिया आणि जर्मनी सारख्या देशांमध्ये अनेक ठिकाणी कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.
दक्षिण आफ्रिकेत भीतीचं वातावरण
ब्रिटेन (Britain) ने एक नव्या कोरोना व्हेरिएंटमुळे (Coronavirus New Variant) दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि इतर काही देशांमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. शुक्रवारी विमानसेवा बंद करण्यात आली. वैज्ञानिकांनी या व्हेरिएंटला चिंतेचं कारण म्हटलं आहे. कारण यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्णांची वाढ होत आहे.