राजकोट : पहिल्या टेस्टमध्ये भारतानं वेस्ट इंडिजचा इनिंग आणि 272 रननी पराभव केला. भारताचा घरच्या मैदानातला हा 100वा विजय आहे. या मॅचच्या तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजनं त्यांच्या 20 पैकी 14 विकेट गमावल्या. रनच्या हिशोबानं भारताचा हा दुसरा सगळ्यात मोठा विजय आहे. या मॅचमध्ये भारताचा विजय झाला असला तरी आयसीसीच्या नव्या नियमांमुळे भारतीय खेळाडू मात्र हैराण झालेले पाहायला मिळाले. यामध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीही होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

30 सप्टेंबरपासून आयसीसीनं मॅचदरम्यान पाणी पिण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार खेळाडूंना 43 मिनिटं पाणी पिण्यास बंदी आहे. तसंच विकेट गेल्यानंतर किंवा ओव्हर संपल्यानंतरच खेळाडू पाणी पिऊ शकतो, असा नियम आयसीसीनं बनवला आहे. आयसीसीनं हा नियम बनवला असला तरी अंपायरच्या परवानगीनं कधीही ड्रिंक्स ब्रेक घेता येणार आहे. खेळामध्ये व्यत्यय येऊ नये तसंच नियोजीत वेळेमध्ये खेळ पूर्ण व्हायला पाहिजे, म्हणून आयसीसीनं हा नियम केला आहे.


आयसीसीच्या या नियमावर विराट कोहलीनं नाराजी व्यक्त केली आहे. अंपायरनी नव्या नियमांनुसार आम्हाला जास्त पाणी पिऊन दिलं नाही. राजकोटमध्ये तिन्ही दिवस तापमान 40 डिग्रीपेक्षा जास्त होतं. अशा परिस्थितीमध्ये 40 ते 45 मिनिटं पाणी न पिणं कठीण होतं. आयसीसी या गोष्टींकडे लक्ष देईल, असा मला विश्वास आहे, असं कोहली म्हणाला.


पुजारानं केली पाण्याची सोय


ड्रिंक्स ब्रेकवरची बंदी लक्षात घेता चेतेश्वर पुजारानं बॅटिंग करताना खिशात पाण्याची बाटली ठेवली होती. या बाटलीमधूनच तो पाणी पित होता. याआधी कधीच खेळाडूनं मैदानात अशाप्रकारे खिशात पाण्याची बाटली ठेवली नव्हती. पुजारानं खिशामध्ये पाण्याची बाटली ठेवल्यामुळे ड्रिंक्स ब्रेकचा वेळही वाचला आणि त्याला तहान लागल्यावर तो पाणीही पिऊ शकला.