मुंबई : सौरव गांगुलीचा बीसीसीआयचा अध्यक्ष व्हायचा मार्ग मोकळा झाला आहे. २३ ऑक्टोबरला गांगुली अध्यक्षपद स्वीकारेल. निवडणुकीसाठी अर्ज दाखल करायची १४ ऑक्टोबर शेवटची तारीख होती, पण अध्यक्षपदासाठी गांगुली वगळता इतर कोणाचाच अर्ज न आल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर गांगुलीने त्याच्या नव्या टीमसोबतचा एक फोटो शेयर केला आहे. या फोटोमध्ये जय शाह, जयेश जॉर्ज, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर, अरुण धुमल आणि माहिम वर्मा दिसत आहेत. 'बीसीसीआयची नवीन टीम... चांगलं काम करु, अशी अपेक्षा आहे. अनुराग ठाकूर यांचे आभार', असं ट्विट गांगुलीने केलं आहे.



बीसीसीआयचे सचिव म्हणून जय शाह, उपाध्यक्ष माहिम वर्मा, संयुक्त सचिव जयेश जॉर्ज, कोषाध्यक्ष अरुण धुमल यांनी आणि आयपीएलच्या अध्यक्षपदासाठी ब्रजेश पटेल यांनी अर्ज दाखल केला होता. यांच्याविरोधात कोणीही अर्ज दाखल न केल्यामुळे या सगळ्यांची निवडही बिनविरोध झाली आहे.


सौरव गांगुली २०२० पर्यंतच बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर कायम राहिल. बीसीसीआयच्या नियमांनुसार गांगुलीला विश्रांती घ्यावी लागेल. लागोपाठ ६ वर्ष कोणताही प्रशासक पदावर राहू शकत नाही. गांगुली २०१५ पासून बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आहे.


२३ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेली प्रशासकीय समिती कारभार सौरव गांगुलीच्या टीमला देईल. यानंतर ३३ महिन्यांनी प्रशासकीय समितीचं अस्तित्वही संपून जाईल. लोढा समितीच्या शिफारसी लागू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने प्रशासकीय समितीची नेमणूक केली होती. विनोद राय हे या समितीचे अध्यक्ष होते.