ऐकावं ते नवलच! न्यूझीलंडचा प्रशिक्षकच फिल्डिंगसाठी मैदानात
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे मॅचमध्ये भारताचा पराभव झाला.
ऑकलंड : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे मॅचमध्ये भारताचा पराभव झाला. या पराभवासोबतच भारताने ही वनडे सीरिजही गमावली आहे. न्यूझीलंडने या मॅचसोबतच सीरिजही खिशात टाकली असली तरी त्यांना मोठ्या नामुष्कीचा सामना करावा लागला. न्यूझीलंडचा फिल्डिंग प्रशिक्षक लूक राँची याला चक्क फिल्डिंगसाठी मैदानात उतरावं लागलं.
मॅच सुरु होण्याआधी न्यूझीलंडने मिचेल सॅन्टनर याची १२वा खेळाडू म्हणून घोषणा केली होती. ३६व्या ओव्हरमध्ये मिचेल सॅन्टनरचं पोट खराब झाल्यामुळे तो ड्रेसिंग रूममध्ये गेला. सॅन्टनरशिवाय न्यूझीलंडच्या टीममध्ये असलेला केन विलियमसनला खांद्याची दुखापत झाली आहे. तर स्कॉट कुगलेजीनला ताप आल्यामुळे तोदेखील फिल्डिंगसाठी उपलब्ध होऊ शकला नाही. अखेर ३७व्या ओव्हरमध्ये लूक राँचीला न्यूझीलंडच्या टीमचा जर्सी घालून मैदानात फिल्डिंगला यावं लागलं.
न्यूझीलंडवर अशाप्रकारची वेळ यायची ही काही पहिली वेळ नाही. याआधी मागच्यावर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीमध्ये झालेल्या टेस्ट मॅचवेळीही न्यूझीलंडची अशाच प्रकारची अडचण झाली होती. त्या टेस्ट मॅचवेळीही न्यूझीलंडचे खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यामुळे बॅटिंग प्रशिक्षक पीटर फलटणला फिल्डिंगसाठी यावं लागलं होतं.
लूक राँचीने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं आहे. २०१५ साली न्यूझीलंड वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचली होती. या टीममध्ये लूक राँची होता.
लूक राँचीने आपली शेवटची वनडे मॅच न्यूझीलंडकडून २०१७ साली बांगलादेशविरुद्ध खेळली. राँचीने त्याच्या कारकिर्दीत ८५ वनडे मॅचमध्ये १,३९७ रन केले. ३३ टी-२० आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये राँचीच्या नावावर ३५९ रन आहेत. न्यूझीलंडच्या टीमकडून राँची ४ टेस्ट मॅचही खेळल्या आहेत.