पतीपासून कोरोनाचा धोका, मुंबई इंडियन्सच्या क्रिकेटपटूची पत्नी गेली माहेरी
कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावार जीवित आणि आर्थिक हानी झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अनेक देश कुलुपबंद झाले आहेत. कोरोनाचा फटका क्रिकेट स्पर्धांनाही बसला आहे. जगातली सगळ्यात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेली आयपीएलही कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली आहे.
पाकिस्तानची स्थानिक टी-२० स्पर्धा असलेल्या पाकिस्तान सुपर लीगमधूनही परदेशी खेळाडू मायदेशात परतत आहेत. पाकिस्तान सुपर लीगमधून मायदेशात गेलेल्या न्यूझीलंडच्या मिचेल मॅकलॅनघनला वेगळ्याच अडचणीचा सामना करावा लागतोय.
कोरोनाची लागण झालेल्यांना रुग्णालयात वेगळं ठेवण्यात येत आहे. या रुग्णांना त्यांच्या कुटुंबियांपासूनही लांब राहावं लागत आहे. या कारणामुळे मॅकलॅनघनची पत्नी त्यांचं घर सोडून माहेरी गेली आहे.
कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे मॅकलॅनघन पाकिस्तान सुपर लीग अर्धवट सोडून न्यूझीलंडला परतला. न्यूझीलंड परदेशातून येणाऱ्या नागरिकांना १४ दिवसांसाठी वेगळं ठेवत आहे. त्यामुळे मिचेल मॅकलॅनघनलाही त्याच्या घरी एकटं राहावं लागत आहे.
मिचेल मॅकलॅनघनने ट्विट करुन त्याच्या बायकोने लिहिलेल्या नोटबद्दल सांगितलं. 'वेगळं राहण्यासाठी सरळ घरी आलो आहे. पत्नीने लिहिलेली नोट आता पाहिली. आई-वडिलांसोबत राहण्यासाठी ती माहेरी गेली आहे. १४ दिवसांनंतर परत येईन, असं तिने लिहिलं आहे,' असं ट्विट मॅकलॅनघनने केलं आहे.
३३ वर्षांचा मिचेल मॅकलॅनघन पीएसएलमध्ये कराची किंग्स या टीमकडून खेळतो. पीएसएल संपल्यानंतर तो आयपीएल खेळण्यासाठी भारतात येणार होता. आयपीएलमध्ये मॅकलॅनघन मुंबई इंडियन्सच्या टीमचा भाग आहे. आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आल्यामुळे मॅकलॅनघन न्यूझीलंडला परतला.