मुंबई : सचिन तेंडुलकर जेव्हा क्रिकेटच्या मैदानात उतरायचा तेव्हा नेहमी नवनवीन विक्रम बनवायचा. पण आता सचिनने संन्यास घेतल्यानंतर त्याने केलेली ही रेकॉर्ड तुटायला लागली आहे. सचिनची बहुतेक रेकॉर्ड विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथसारखे दिग्गज बॅट्समन तोडत असतानाच, न्यूझीलंडचा फास्ट बॉलर टीम साऊदीही या यादीत आला आहे. टीम साऊदीच्या या रेकॉर्डजवळ कोहली आणि स्मिथही पोहोचू शकले नाहीत. टीम साऊदी हा सचिन तेंडुलकर आणि क्लाईव्ह लॉईड या महान खेळाडूंच्याही पुढे गेला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम साऊदीने सोमवारी श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये १० बॉलवर २४ रन केले. या खेळीमध्ये साऊदीने २ सिक्सही मारले. याचसोबत साऊदीचे टेस्ट क्रिकेटमध्ये ७१ सिक्स झाले आहेत. साऊदी बॅटिंगला आला तेव्हा तो सचिनच्या ६९ सिक्सच्या रेकॉर्डशी बरोबरीत होता. साऊदीने या २ सिक्ससह क्लाईव्ह लॉईड (७० सिक्स) आणि युनिस खान (७० सिक्स) यांनाही मागे टाकलं आहे.


क्रिकेट जगतात फक्त १५ क्रिकेटपटूंनी ७० पेक्षा जास्त सिक्स मारले आहेत. यात साऊदी १५व्या क्रमांकावर आहे. सध्या टेस्ट क्रिकेट खेळत असलेला एकही खेळाडू साऊदीच्या पुढे नाही. टीम साऊदीची ही ६७वी टेस्ट मॅच होती, म्हणजेच साऊदी प्रत्येक टेस्ट मॅचमध्ये एकापेक्षा जास्त सिक्स मारतो. सचिनने २०० टेस्टमध्ये ६९ सिक्स, कोहलीने ७८ टेस्टमध्ये १९ सिक्स आणि स्मिथने ६६ टेस्टमध्ये ३८ सिक्स लगावले आहेत.


टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स लगावण्याचा विक्रम न्यूझीलंडच्याच ब्रॅण्डन मॅक्कलमच्या नावावर आहे. मॅक्कलमने १०१ मॅचमध्ये १०७ सिक्स लगावल्या. ऍडम गिलख्रिस्ट दुसऱ्या (१०० सिक्स), क्रिस गेल तिसऱ्या (९८ सिक्स) क्रमांकावर आहेत. भारताकडून सेहवागने सर्वाधिक ९१ सिक्स आणि धोनीने ७८ सिक्स मारले आहेत.


धोनीच्या पुढे जाण्यासाठी साऊदीला आणखी ९ सिक्सची गरज आहे. पण साऊदीच्या निशाण्यावर आता पाँटिंगचं रेकॉर्ड असेल. पाँटिंगने टेस्ट क्रिकेटमध्ये ७३ सिक्स मारले आहेत. पाँटिंगला मागे टाकण्यासाठी साऊदीला आणखी ४ सिक्सची गरज आहे.


११ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये साऊदीने ६७ टेस्ट मॅचमध्ये २५१ विकेट घेतल्या आहेत. तर १४० वनडेमध्ये १८६ विकेट आणि ५८ टी-२०मध्ये ६७ विकेट घेण्यात त्याला यश आलं. साऊदीने २६५ आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये साऊदीने ५०४ विकेट घेतल्या आहेत. साऊदीने टेस्टमध्ये १,६११ रन, वनडेमध्ये ६७६ रन आणि टी-२० मध्ये १४८ रन केले आहेत.