भारताविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी न्यूझीलंड टीमची घोषणा, ८ खेळाडूंना दुखापत
भारतीय क्रिकेट टीम या महिन्यात न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे.
ऑकलंड : भारतीय क्रिकेट टीम या महिन्यात न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातल्या टी-२० सीरिजसाठी न्यूझीलंडने टीमची घोषणा केली आहे. ८ खेळाडूंना दुखापत झाल्यामुळे न्यूझीलंडने त्यांना स्थान दिलेलं नाही. ट्रेन्ट बोल्टसह हे ८ खेळाडू दुखापतीमुळे भारताविरुद्धची टी-२० सीरिज खेळू शकणार नाहीत.
भारतीय टीम सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सीरिज खेळत आहे. ही सीरिज १९ जानेवारीला संपणार आहे. यानंतर भारतीय टीम न्यूझीलंडला रवाना होईल. न्यूझीलंडमध्ये भारतीय टीम एकूण १० मॅच खेळणार आहे. यामध्ये ५ टी-२०, ३ वनडे आणि २ टेस्ट मॅचचा समावेश आहे. दोन्ही टीममध्ये पहिली टी-२० मॅच २४ जानेवारीला खेळवण्यात येणार आहे.
केन विलियमसन हा न्यूझीलंडच्या टीमचा कर्णधार आहे. दुखापतीमुळे केन विलियमसनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या टेस्ट मॅचमध्ये खेळता आलं नव्हतं. विलियमसन आता पूर्णपणे फिट असल्याचं न्यूझीलंड बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.
न्यूझीलंडच्या टीममध्ये हमिश बेनेटने ३ वर्षानंतर पुनरागमन केलं आहे. २०१७ साली हमिशने शेवटची वनडे मॅच खेळली होती. हमिशने आतापर्यंत एकही टी-२० मॅच खेळलेली नाही. लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लेथम, ट्रेन्ट बोल्ट, सेथ रेंस, डग ब्रेसवेल, विल यंग आणि ऍडम मिलने यांना दुखापत झाल्यामुळे त्यांची निवड झालेली नाही. तसंच कॉलिन डि ग्रॅण्डहोमला पहिल्या ३ मॅचसाठी संधी देण्यात आली आहे. उरलेल्या दोन मॅचसाठी डि ग्रॅण्डहोमऐवजी टॉम ब्रुस टीममध्ये असेल.
न्यूझीलंडची टी-२० टीम
केन विलियमसन (कर्णधार), हमिश बेनेट, मार्टिन गप्टील, स्कॉट कुगलेजन, डॅरिल मिचेल, कॉलिन मुन्रो, रॉस टेलर, ब्लेयर टिकर, मिचेल सॅन्टनर, टीम सिफर्ट, इश सोदी, टीम साऊदी, कॉलिन डि ग्रॅण्डहोम, टॉम ब्रुस
टी-२० सीरिजसाठी भारतीय टीम
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, श्रेयस अय्यर, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, मनिष पांडे, ऋषभ पंत, कुलदीप यादव