रावळपिंडी : न्यूझीलंड क्रिकेट संघाने (New Zealand Cricket Team) पहिला एकदिवसीय सामना सुरू होण्याच्या काही क्षण आधी सुरक्षेचं कारण देत पाकिस्तानचा दौरा रद्द केला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) मात्र न्यूझीलंड संघाच्या सुरक्षेला कोणताही धोका नसल्याचं म्हटलं आहे.


रावळपिंडीत हायव्होल्टाज ड्रामा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान-न्यूझीलंड मर्यादित षटकांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना आज रावळपिंडी स्टेडियमवर खेळवला जाणार होता. पण सामन्याची वेळ झाल्यानंतरही दोन्ही संघ आपापल्या खोलीतच होते. यानंतर न्यूझीलंड क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड व्हाईट यांनी एक निवेदन जारी करत म्हटलं, आम्हाला जी माहिती मिळत आहे, त्यानुसार दौरा सुरु ठेवणं शक्य नाही.


खेळाडूंची सुरक्षा महत्त्वाची 


यजमान पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी (Pakistan Cricket Board) हा मोठा धक्का असेल, पण खेळाडूंची सुरक्षा सर्वात महत्वाची आहे आणि आम्हाला विश्वास आहे की हा एक जबाबदारीची निर्णय आहे, असं डेव्हिड व्हाईट (David White) यांनी म्हटलं आहे.


डेव्हिड व्हाईट यांच्या निर्णयाचं समर्थन


न्यूझीलंड क्रिकेट प्लेयर्स असोसिएशनचे (New Zealand Cricket Players Association) मुख्य कार्यकारी अधिकारी हीथ मिल्स यांनीही व्हाईट यांच्या मतांशी सहमती दर्शवली आहे. 'खेळाडू सुरक्षित आहेत आणि प्रत्येकजण आपल्या हितासाठी वागत असतो', असं मिल्स यांनी म्हटलं आहे.


न्यूझीलंड क्रिकेट संघाला (New Zealand Cricket) सुरक्षेबाबत इंटेलिजेंस अलर्ट मिळाला होता. आता न्यूझीलंड संघाला लवकरात लवकर पाकिस्तानातून बाहेर काढण्याची तयारी सुरु झाली आहे.


पीसीबीने केला सुरक्षेचा दावा


दरम्यान, पीसीबीने एका निवेदनात म्हटले आहे की, 'पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तान सरकार पाहुण्या संघांसाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करते . आम्ही न्यूझीलंड क्रिकेटलाही याबद्दल आश्वासन दिलं. पाकिस्तानचे पंतप्रधान न्यूझीलंडच्या पंतप्रधानांशी वैयक्तिक पातळीवर बोलले आणि त्यांना सांगितले की आमच्याकडे जगातील सर्वोत्तम गुप्तचर यंत्रणा आहे आणि पाहुण्या संघाला कोणत्याही प्रकारचा सुरक्षा धोका नाही.


पीसीबी अजूनही मालिका खेळण्यास तयार


पीसीबीने सांगितले की, न्यूझीलंड संघासोबत असलेले सुरक्षा अधिकारीही इथल्या सुरक्षा व्यवस्थेबाबत समाधानी आहेत. 'पीसीबी सामने आयोजित करण्यास तयार आहे.' पाकिस्तान आणि जगभरातील क्रिकेट प्रेमी शेवटच्या क्षणी मालिका रद्द झाल्यामुळे निराश होतील. या मालिकेत 3 एकदिवसीय आणि 5 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले जाणार होते.