भारताविरुद्धच्या सीरिजआधी न्यूझीलंडला धक्का, प्रमुख खेळाडू बाहेर
ऑस्ट्रेलियाकडून टेस्ट सीरिजमध्ये ३-०ने व्हाईट वॉश झाल्यानंतर आता न्यूझीलंडची टीम भारताविरुद्धच्या सीरिजसाठी तयारी करत आहे.
वेलिंग्टन : ऑस्ट्रेलियाकडून टेस्ट सीरिजमध्ये ३-०ने व्हाईट वॉश झाल्यानंतर आता न्यूझीलंडची टीम भारताविरुद्धच्या सीरिजसाठी तयारी करत आहे. पण भारताविरुद्धच्या सीरिजआधीच न्यूझीलंडला मोठा धक्का लागला आहे. न्यूझीलंडचा प्रमुख बॅट्समन टॉम लेथमला दुखापत झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये लेथमला फ्रॅक्चर झालं. लेथमची दुखापत बरी व्हायला ४ आठवड्यांचा वेळ लागणार आहे.
दुखापतीतून सावरायला ४ आठवड्यांचा वेळ लागणार असल्यामुळे टॉम लेथम टी-२० सीरिज तर खेळणारच नाही, पण त्याच्या वनडे सीरिजच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्ह आहे. पण टेस्ट सीरिजसाठी मात्र लेथम फिट होईल. २२ फेब्रुवारीपासून भारत आणि न्यूझीलंडच्या टेस्ट सीरिजला सुरुवात होईल.
न्यूझीलंडच्या टीमला गेल्या काही दिवसांमध्ये दुखापतींचं ग्रहण लागलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजवेळी कर्णधार केन विलियमसन, ट्रेन्ट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन आणि मॅट हेन्री दुखापतीमुळे वेगवेगळ्या टेस्टमध्ये खेळू शकले नाहीत.
भारत आणि श्रीलंका यांच्यात सध्या टी-२० सीरिज सुरु आहे. या टी-२० सीरिजनंतर ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर ३ वनडे मॅचची सीरिज खेळणार आहे. यानंतर भारत न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यात भारत ५ टी-२०, ३ वनडे आणि २ टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात २४ जानेवारीपासून टी-२० सीरिजने होईल.