...तर आयपीएलचं आयोजन पाकिस्तानमध्ये, उमर अकमल पुन्हा ट्रोल
सुपर लीगचे सोशल मीडियावर प्रमोशन करताना उमर अकमल पीएसएल ऐवजी आयपीएल असे म्हणाला आहे.
इस्लामाबाद : पाकिस्तानी खेळाडूंकडून मॅचदरम्यान आणि मैदानाबाहेर आतापर्यंत अनेक चूका झाल्या आहेत. त्यापैकी बहुतांश चुका या हास्यास्पद आणि विनोदी ठरल्या आहेत. आता यातच पाकिस्तानचा खेळाडू उमर अकमलने चूक केली आहे. या चुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. क्रिकेट विश्वात सध्या टी-२० क्रिकेटची चलती आहे. त्यातच काही दिवसांमध्ये आयपीएल स्पर्धा सुरु होत आहे. आयपीएल बद्दल असलेली उत्सुकता प्रत्येक क्रिकेटप्रेमीला माहिती आहे.
त्याचं झालं असं की, सध्या पाकिस्तानामध्ये पाकिस्तान सुपर लीग ही टी-२० क्रिकेट स्पर्धा सुरु आहे. या सुपर लीगचे सोशल मीडियावर प्रमोशन करताना उमर अकमल पीएसएल ऐवजी आयपीएल असे म्हणाला आहे. त्यामुळे उमरची सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. आपल्याकडून झालेली चूक लक्षात येताच अकमलने आपली चूक दुरुस्त केली. पण तेव्हापर्यंत फार उशीर झाला होता. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
'साहजिकपणे क्वेटाची टीम कराचीत दाखल झाली आहे. कराची आमचे होमग्राऊंड आहे. त्यामुळे क्रिकेट चाहते आम्हाला ज्या प्रमाणात खेळण्यासाठी प्रोत्साहन देतील, तेवढीच चांगली खेळी आम्हाला करता येईल. तसेच या स्पर्धेतील इतर टीमना अशाच प्रकारे प्रोत्साहन मिळाले तर, ती वेळ दुर नाही की पुढील आयपीलचे माफ करा, पीएसलचे आयोजन कराचीत होईल.' असे उमर अकमल व्हिडीओत म्हणाला आहे.
आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या हंगामांमध्ये पाकिस्तानच्या काही खेळाडूंना सहभागी करण्यात आले होते. परंतू सीमेवरील वाढत्या कुरापती आणि भारत-पाक यांच्यातील ताणलेल्या संबंधांमुळे पाकिस्तानच्या खेळाडूंवर बंदी टाकण्यात आली आहे. तरी देखील पाकिस्तानचे आयपीएल वरील असलेले प्रेम कमी झालेले नाही. याचीच प्रचीती उमरच्या या वक्तव्यावरुन आली आहे.
पीएसल क्रिकेट स्पर्धेला १४ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून यात एकूण सहा टीम सहभागी झाल्या आहेत. उमर अकमल क्वेटा ग्लेडिएर्ट्स या टीमकडून खेळत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पीएसएलच्या सुरुवातीच्या काही मॅच या युएईमध्ये खेळवल्या जातात. तर फायनलसह शेवटच्या काही मॅच या पाकिस्तानमध्ये खेळवण्यात येतात.