क्रिकेटपटू सनथ जयसूर्या बांग्लादेशला म्हणाला `थर्ड क्लास`
श्रीलंका आणि बांग्लादेश या दोन खेळाडूंमध्ये मैदानवर घडेलेल्या वादाचे पडसाद मैदानाबाहेरही उमटल्याने क्रिकेट विश्वातील वातावरण भलतेच तापले आहे.
नवी दिल्ली : श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्याने बांग्लादेशी क्रिकेटपटूंना 'थर्ड क्लास' म्हटल्याने जोरदार वाद निर्माण झाला आहे. श्रीलंका आणि बांग्लादेश या दोन खेळाडूंमध्ये मैदानवर घडेलेल्या वादाचे पडसाद मैदानाबाहेरही उमटल्याने क्रिकेट विश्वातील वातावरण भलतेच तापले आहे.
मैदानावरच भिडले खेळाडू
कोलंबो येथील आर प्रेमदास स्टेडीयमवर श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात शुक्रवारी खेळल्या गेलेल्या टी-२० सामन्यात मैदानावरील वातावरण भलतेच गरम झाले. दोन्ही देशांतील खेळाडूंमध्ये मैदानावर घडलेला हा वाद मैदानाबाहेर ड्रेसिंगरूम पर्यंतही पोहोचला. जिथे ड्रेसिंग रूमचे आरसेही तुटलेले आढळले. आरोप केला जात आहे की, बांग्लादेशी खेळाडूंनीच ड्रेसिंगरूममधील आरसे तोडले. दरम्यान, या प्रकारावर प्रतिक्रीया देताना माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्याने बांग्लादेशी खेळाडूंना थर्ड क्लास असे म्हटले. जयसूर्याने तशा प्रकारचे ट्विटही केले.
ट्विट डिलिट करण्याची नामुश्की
जयसूर्याने आपल्या ट्विटर हॅंडलवर म्हटले आहे की, 'श्रीलंकेविरूद्ध सामना जिंकल्यावर विजयाचा जल्लोष साजरा करताना खेळाडूंनी आर प्रेमदासा स्टेडियमवरील ड्रेसिंग रूममधील आरसेही बांग्लादेशी खेळाडूंनी फोडले. थर्ड क्लास वर्तन.' दरम्यान, कोणत्याही पुराव्याशिवाय जयसूर्याने असे ट्विट केले खरे. पण, आपले काहीतरी चुकत असल्याचे ध्यानात येताच त्याने आपले ट्विटही डिलिट केले. दरम्यान, जयसूर्याने हे ट्विट डिलिट करण्यापूर्वीच एका यूजरने ट्विटचा स्क्रिनशॉट काढला होता. जो सध्या भलताच व्हायरल झाला आहे.
पंचांच्या हस्तक्षेपामुळे मारामारी टळली
शुक्रवारी खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान, श्रीलंका आणि बांग्लादेश या दोन्ही देशांच्या खेळाडूंमध्ये मैदानावरच बाचाबाची झाली. पंचांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि हातघाईवर आलेले प्रकरण मारामारीपर्यंत पोहोचण्यापासून टळले.