पूर्वी ३०० रुपयांसाठी हार्दिक पांड्या करायचा `हे` काम!
भारतीय क्रिकेट संघाचा ऑलराऊंडर क्रिकेटर हार्दिक पांड्या सध्या चांगलाच फार्ममध्ये आहे.
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा ऑलराऊंडर क्रिकेटर हार्दिक पांड्या सध्या चांगलाच फार्ममध्ये आहे. तसंच त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे अनेकांचा आवडता आहे. हार्दिकप्रमाणे त्याचा भाऊ क्रुणाल देखील चांगला क्रिकेटर आहे. सध्या भारतीय संघातील त्याचे स्थान निश्चित झालेले नसले तरी तो आयपीएलच्या मुंबई इंडियन्स टिमचा तो महत्त्वाचा खेळाडू आहे. आता दोघांकडे नेम, फेम आहे. मात्र हे सगळे काही सहज मिळालेले नाही.
फक्त ३०० रुपयांसाठी करायचे हे काम
दोघांनाही सुरुवातीपासून खूप संघर्ष करावा लागला आहे. पूर्वीची परिस्थिती फार वेगळी होती. त्यांच्या घरची आर्थिक स्थितीही फारशी चांगली नव्हती. अशावेळी ते दोघे फक्त ३०० रुपयांसाठी गुजरातच्या गावागावात जावून क्रिकेट खेळत. काही दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात मुकेश अंबानींच्या पत्नी नीता अंबानींनी या दोन्ही भावांची ही भावूक कहाणी सांगितली.
नीता अंबानी म्हणाल्या...
नीता अंबानींनी कार्यक्रमादरम्यान सांगितले की, मी तुम्हाला एक गोष्ट ऐकवू शकते. दोन भावांची अतिशय शानदार गोष्ट. हे दोन्ही भाऊ गुजरातमध्ये राहत होते. जे अगदी सामान्य घरात जन्मलेले, वाढलेले. घरची आर्थिक परिस्थिती अगदीच सामान्य. मात्र त्यामुळे ते खचले नाहीत. ते खेळत राहिले. एका गावातून दुसऱ्या गावात जात खेळत राहिले. कधी बिना तिकट प्रवास करत राहिले. ही सर्व मेहनत ते फक्त ३०० रुपयांसाठी करत होते. त्यावेळेस त्यांना त्यांच्या बदलणाऱ्या नशीबाचा अंदाज नव्हता. २०१३ मध्ये बडोदाच्या टी-२० टुर्नामेंट खेळताना त्यातील लहान भावाने लक्ष वेधले आणि रिलायन्स वन टीमसाठी त्याची निवड झाली. त्याच्या दमदार कामगिरीमुळे त्याची निवड मुंबई इंडियन्समध्ये झाली. आता त्याला संपूर्ण जग ओळखतं. त्याचं नाव आहे हार्दिक पांड्या.