ऍडलेड : बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू डेव्हिड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ आणि कॅमरून बँकरॉफ्टवर बंदी घातली. या बंदीनंतर स्मिथ आणि वॉर्नरसोबत सार्वजनिक वर्तणूक चुकीची झाल्याचं भारताचा कर्णधार विराट कोहली म्हणाला. त्यांच्यासोबत झालेल्या वागणुकीमुळे मी निराश झालो होतो. मला खूप दु:ख झालं. कोणासोबतच असं वर्तन होऊ नये, कारण मी वॉर्नर आणि स्मिथला ओळखतो, अशी प्रतिक्रिया विराटनं दिली. फॉक्स क्रिकेटसाठी ऑस्ट्रेलियाचा माजी विकेट कीपर ऍडम गिलख्रिस्टनं विराट कोहलीची मुलाखत घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मैदानातली प्रतिस्पर्धा आणि संघर्षानंतर तुम्हाला अशा गोष्टी पाहण्याची इच्छा नसते. तो सगळा प्रकार पाहून मी निराश झाल्याचं विराट म्हणाला. दक्षिण आफ्रिकेतून ऑस्ट्रेलियात परतलेल्या स्मिथ आणि वॉर्नर यांना अपराध्यांसारखी वागणूक देण्यात आली. अनेक माजी क्रिकेटपटूंनाही स्मिथ-वॉर्नरला मिळालेली ही वागणूक खटकली होती. कोहलीवरही या गोष्टीचा परिणाम झाला.


स्मिथ आणि वॉर्नर विमानतळावर पोहोचले तेव्हा त्यांना ज्या पद्धतीनं वागवण्यात आलं आणि त्यांना जसं विमानतळाबाहेर नेण्यात आलं, ते पाहून मी हैराण झालो. ते सगळं पाहून वॉर्नर-स्मिथसोबत खराब वर्तणूक करण्यात आल्याचं मला वाटलं, असं वक्तव्य विराटनं केलं.


वॉर्नर आणि स्मिथला मिळालेल्या वर्तणुकीबद्दल मी बोलू शकतो. पण त्यांना देण्यात आलेल्या शिक्षेवर मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही, असं विराट कोहलीनं स्पष्ट केलं.


दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी वॉर्नर, स्मिथ आणि बँकरॉफ्ट दोषी आढळले. बँकरॉफ्टनं बॉलशी छेडछाड केली पण ही सगळी रणनिती तेव्हा कर्णधार असलेला स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांची होती, असं समोर आलं. त्यामुळे बँकरॉफ्टवर ९ महिन्यांची आणि स्मिथ-वॉर्नरवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली.