Rohit Sharma: भारतीय चाहत्यांना ज्या क्षणाची उत्सुकता होती तो अखेर आलाच. टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकप 2024 च्या ट्रॉफीवर आपलं नावं कोरलं. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने फायनल सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा 7 रन्सने पराभव केला. यासह टीम इंडिया या संपूर्ण टूर्नामेंटमध्ये अजिंक्य राहिली. या विजयानंतर टीम इंडियाने मैदानात सेलिब्रेशन केलं, मात्र यावेळी रोहित शर्माच्या एका कृत्याचं मोठ्या प्रमाणात कौतुक होतंय.


रोहितने विरोधी टीमला केला सन्मान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताने ज्यावेळी फायनल जिंकली तेव्हा सर्व खेळाडू आनंद साजरा करत होते. तर दुसरीकडे मैदानात दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू हस्तांदोलन करण्यासाठी एका रांगेत उभे राहिले होते. क्रिकेट सामन्यानंतर दोन्ही टीममधील खेळाडूंनी हस्तांदोलन करण्याची एक पद्धत आहे. दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू आल्याचं पाहून रोहितने आपल्या सर्व खेळाडूंना एकत्र येण्याचा इशारा दिला. कर्णधाराच्या सांगण्यावरून टीम इंडियाच्या खेळाडूंनी सेलिब्रेशन सोडून प्रथम दक्षिण आफ्रिकेच्या टीमशी हस्तांदोलन केले.


रोहितच्या निर्णयाचं होतंय कौतुक


दरम्यान रोहितने त्याच्या खेळाडूंना सेलिब्रेशन सोडून दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना हस्तांदोलन करण्यास सांगितल्याच्या निर्णयाचं सोशल मीडियावर कौतुक होतंय. यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू यांच्यात अशीच एक घटना घडली. या सामन्यामध्ये चेन्नईचा पराभव झाल्यानंतर सर्व खेळाडू बंगळुरुच्या खेळाडूंशी हात मिळवण्यासाठी रांगेत उभे होते. पण बंगळुरुचे खेळाडू जल्लोषात सर्व विसरुन गेले होते. चेन्नईच्या खेळाडूंनी बराच वेळ त्यांची वाट पाहिली. पण बंगळुरुच्या खेळाडू्ंनी त्यांच्याकडे पाहिलं ही नाही. त्यामुळे काही वेळाने धोनी टीमला घेऊन ड्रेसिंग रुमकडे निघून गेला होता. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.



पुन्हा सेलिब्रेशनला झाली सुरुवात


दक्षिण आफ्रिकेच्या टीमला भेटल्यानंतर भारतीय खेळाडूंनी पुन्हा आनंद साजरा करण्यास सुरुवात केली. T20 वर्ल्डकपपासून ते वनडे वर्ल्डकपपर्यंत भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभूत झाला होता. पण यावेळी अखेर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवून आपले स्वप्न पूर्ण केलं. यामुळे भारतीय चाहते देखील खुशीत आहेत.


रोहित बनला तिसरा चॅम्पियन कर्णधार


रोहित शर्मा वर्ल्डकप जिंकणारा भारताचा तिसरा कर्णधार ठरला आहे. 1983 मध्ये भारताने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीने कर्णधार म्हणून टी-20 वर्ल्डकप जिंकला. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 2011 मध्ये विश्वविजेता बनला होता. आता 2024 मध्ये भारतासाठी वर्ल्डकप जिंकणारा रोहित शर्मा तिसरा कर्णधार ठरला आहे.