दुबई : T20 वर्ल्डकप 2021 मध्ये वेस्ट इंडिजचा श्रीलंकेकडून 20 धावांनी पराभव झाला. या पराभवासह गतविजेता वेस्ट इंडिज संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडलाय. या पराभवामुळे निराश झालेल्या अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ड्वेन ब्राव्हो वेस्ट इंडिजकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर फेसबुक लाइव्ह शोमध्ये माजी कर्णधार डॅरेन सॅमी आणि समालोचक अॅलेक्स जॉर्डन यांच्याशी झालेल्या संभाषणात ब्राव्होने निवृत्ती घेणार असल्याचं सांगितलं.


ब्राव्हो म्हणाला, "मला वाटतं की आता वेळ आली आहे. माझी कारकीर्द उत्तम राहिली आहे. 18 वर्षे वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करताना मी काही चढ-उतार पाहिले आहेत. पण जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा कॅरिबियन लोकांचे इतके दिवस प्रतिनिधित्व केल्याबद्दल मी खूप आभारी आहे. त्याच्या कारकिर्दीत तीन आयसीसी जेतेपदे जिंकणं ही मोठी कामगिरी होती."


ब्राव्हो म्हणाला, "हा वर्ल्डकप आमच्या अपेक्षेप्रमाणे नव्हता. ही एक कठीण स्पर्धा होती. आता माझ्याकडे जो काही अनुभव आणि माहिती आहे, ती मी युवा खेळाडूंसोबत शेअर करण्याचा प्रयत्न करू इच्छितो. मला वाटतं की वेस्ट इंडिज क्रिकेटला व्हाईट बॉलच्या फॉर्मेटमध्ये उज्ज्वल भवितव्य आहे आणि आमच्यासाठी खेळाडूंना पाठिंबा देणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं महत्त्वाचं आहे."


38 वर्षीय ब्राव्होने दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. यापूर्वी 2018 मध्येही त्याने निवृत्तीची घोषणा केली होती, मात्र 2019 मध्ये तो पुन्हा एकदा निवृत्तीवरून परतला. ब्राव्होने आतापर्यंत वेस्ट इंडिजकडून 294 सामन्यात 6413 धावा करण्यासोबतच 363 विकेट्स घेतले आहेत.