वेलिंग्टन : अनेक क्रिकेटपटू वेगवेगळे विक्रम केल्यानंतर हे विक्रम त्यांच्या शुभचिंतक, त्यांचा आदर्श किंवा देवाला समर्पित करतात. पण विक्रम केल्यानंतर आपल्या आदर्श खेळाडूची माफी मागण्याचे प्रकार क्वचितच घडतात. न्यूझीलंडचा क्रिकेटपटू रॉस टेलरनं टेस्ट क्रिकेटमधलं १८वं शतक झळकावलं. यानंतर त्यानं अशा खेळाडूची माफी मागितली ज्याने रॉस टेलर माझं रेकॉर्ड मोडेल, अशी भविष्यवाणी केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रॉस टेलरचा माफी मागण्याचा हा प्रकार न्यूझीलंड आणि बांगलादेशमधल्या टेस्ट मॅचदरम्यान झाला. या मॅचच्या पहिले दोन दिवस पावसामुळे खेळ झाला नाही. तिसऱ्या दिवशी बांगलादेशची टीम २११ रनवर ऑल आऊट झाली. यानंतर न्यूझीलंडनं चौथ्या दिवशी ४३२/६ वर डाव घोषित केला. रॉस टेलरनं २०० रन केले. रॉस टेलरचं हे तिसरं द्विशतक आणि १८वं शतक होतं. वनडे क्रिकेटमध्ये टेलरने २० शतकं केली आहेत.


१८व्या शतकासोबतच टेलरनं मार्टिन क्रो यांचं टेस्ट क्रिकेटमधलं १७ शतकांचं रेकॉर्ड मोडलं आहे. मार्टिन क्रो यांनी काही वर्षांपूर्वी टेलर माझं रेकॉर्ड मोडेल, अशी भविष्यवाणी केली होती. टेलरनं क्रो यांची ही भविष्यवाणी खरी करून दाखवली. मार्टिन क्रो यांचं तीन वर्षांपूर्वी कॅन्सरने निधन झालं होतं.


२०१७ साली १७वं शतक झळकावणारा रॉस टेलर म्हणाला 'इथपर्यंत पोहोचण्यासाठी मी एवढा वेळ घालवला, याबद्दल मी मार्टिन क्रो यांची माफी मागतो. मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा १७ मोठी संख्या होती. इथपर्यंत पोहोचणं दिलासादायक होतं पण हे अपेक्षेप्रमाणे झालं नाही. माझ्या डोक्यात या गोष्टी घोळत होत्या.' टेलरनं याचसोबत बेसिन रिजर्वमध्ये सर्वाधिक रन करण्याचं मार्टिन क्रो यांचं रेकॉर्डही मोडलं.


न्यूझीलंडकडून टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करण्याचं रेकॉर्ड केन विलियमसनच्या नावावर आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसननं आत्तापर्यंत टेस्ट क्रिकेटमध्ये २० शतकं केली आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत. सचिननं टेस्ट क्रिकेटमध्ये ५१ शतकं केली.