ODI WC Opening Ceremony : नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भव्य उद्घाटन सोहळा, असा असणार रंगारंग कार्यक्रम
ODI World Cup Opening Ceremony: भारतात 5 ऑक्टोबरपासून आयसीसी एकदिवसीयक क्रिकेट विश्वचषक 2023 स्पर्धा खेळवली जाणार आहे. त्याआधी स्पर्धेचा धमाकेदार उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर या रंगारंग कार्यक्रमाचं आयोजन होणार आहे.
ODI World Cup Opening Ceremony: क्रिकेटचा कुंभमेळा अर्थात एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सुरु होण्यासाठी आता केवळ दोन दिवसांचा अवधी उरला आहे. येत्या 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान भारतात विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सील (ICC) आणि भारतीय क्रिकेट नियामक (BCCI) मंडळाचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. स्पर्धा जितकी चुरशीची असणार आहे तितकाच धमाकेदार स्पर्धेचा उद्घाटन सोहळा करण्याचा प्रयत्न बीसीसीआयचा आहे. स्पर्धा सुरु होण्याच्या एकदिवस आधी म्हणजे चार ऑक्टोबरला रंगारंग उद्घाटन सोहळा होणार आहे.
नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये कार्यक्रम
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) विश्वचषक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा होण्याची शक्यता असून या कार्यक्रमात स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व दहा संघांचे कर्णधार सहभागी होतील आणि त्यांचं फोटोसेशन होईल. उद्घाटन कार्यक्रमात भारतीय संस्कृती आणि सभ्यतेची झलक पाहिला मिळणार आहे.
हे कलाकार सहभागी होणार?
सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार गायक अरिजीत सिंह आणि शंकर महादेवन, गायिका श्रेया घोषाल आणि बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि तमन्ना भाटिया उद्घाटन सोहळ्यात दिसण्याची शक्यता आहे. विश्वचषकाच्या थीम साँगमध्ये अभिनेता रणवीस सिंग आहे. त्यामुळे उद्घाटन सोहळ्यात रणवीर सिंग प्रमुख आकर्षण असल्याची माहिती आहे.
सलामीचा सामना
उद्घाटन सोहळ्यानंतर पाच ऑक्टोबरपासून मुख्य स्पर्धेला सुरुवात होईल. गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंड संघांदरम्यानच्या सामन्याने स्पर्धेला सुरुवात होईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये हा सामना खेळवला जाईल. 2019 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने जेतेपद पटकावलं होतं. जबरदस्त चुरशीच्या ठरलेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडवर शेवटच्या चेंडूवर मात केली होती.
विश्वचषक स्पर्धेच्या आधी सर्व संघांचे दोन सराव सामने होणार आहेत. त्यानंतर चार ऑक्टोबरला सर्व दहा संघांचे कर्णधार अहमदाबादमध्ये दाखल होतील.
46 दिवस चालणार स्पर्धा
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा 5 ऑक्टोबर ते 19 नोव्ंहेंबरदरम्यान खेळवली जाणार आहे. तब्बल 46 दिवस क्रिकेट चाहत्यांना चुरशीच्या सामन्यांची मेजवानी मिळणार आहे. भारताच्या मिशन वर्ल्ड कपची सुरुवात 8 ऑक्टोबरपासून होणार आहे. भारताचा पहिला सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगणार आहे. हा सामना चेन्नईच्या चिदम्बरम स्टेडिअमवर खेळवला जाईल. त्यानंतर 11 ऑक्टोबरला टीम इंडिया अफगाणिस्तानविरुद्ध दोन हात करेल. तर 14 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान आमने सामने येतील. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअवर हा सामना रंगेल.
भारतीय संघाचं वेळापत्रक
8 ऑक्टोबर vs ऑस्ट्रेलिया , चेन्नई
11 ऑक्टोबर vs अफगाणिस्तान दिल्ली
14 ऑक्टोबर vs पाकिस्तान, अहमदाबाद
19 ऑक्टोबर vs बांगलादेश, पुणे
22 ऑक्टोबर vs न्यूझीलंड, धर्मशाला
29 ऑक्टोबर vs इंग्लंड, लखनऊ
2 नोव्हेंबर vs श्रीलंका, मुंबई
5 नोव्हेंबर vs दक्षिण आफ्रिका, कोलकाता
12 नोव्हेंबर vs नेदरलँड , बेंगलुरु