Sagar Dhankhar Murder Case: ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक पटकावून देणाऱ्या सुशील कुमार (Sushil Kumar) याने दिल्लीतील तिहार तुरुंगात आत्मसमर्पण (Surrender In tihar jail) केलं आहे. सुशील कुमार हा ज्युनियर कुस्तीपटूच्या हत्येतील आरोपी आहे. ज्युनियर अॅथलीट सागर धनखरचा खून त्याचबरोबर हत्येचा प्रयत्न यासह दंगल आणि गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप सुशील कुमारवर आहे. गुडघ्याच्या ऑपरेशननंतर सुशील कुमार जामिनावर बाहेर होता. त्यानंतर आता त्याने पुन्हा तिहार जेलमध्ये सरेंडर केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सागर धनखर हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी 170 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. ज्यामध्ये सुशील कुमारला मुख्य आरोपी बनवण्यात आलं होतं. दिल्लीच्या रोहिणी कोर्टाने सुशील कुमारला 23 जुलै ते 30 जुलै या एका आठवड्यासाठी अंतरिम जामीन मंजूर केला होता. वैद्यकीय कारणास्तव सुशील कुमारला जामीन मंजूर करण्यात आला होता.


दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगमध्ये 2021 साली ज्युनियर कुस्तीपटू सागर धनखरला बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर सागर धनखरचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात सुशील कुमारला अटक करण्यात आली होती. न्यायालयाने 12 ऑक्टोबर रोजी सुशील कुमार आणि इतर 17 जणांविरुद्ध खून आणि गुन्हेगारी कटाचे आरोप निश्चित केले होते.


आणखी वाचा - पोलिसांचा आरोपी सुशील कुमारबरोबर सेल्फी, सोशल मीडियावर फोटो व्हायरल


दरम्यान, सुशील कुमार यांना फिर्यादीच्या साक्षीदारांना धमकावू नये, तसेच पुराव्यांशी छेडछाड करू नये आणि इतर कोणत्याही गुन्ह्यात सहभागी होऊ नये, असे आदेश देत सुशील कुमारला जामीन मंजूर झाला होता. आयओच्या मागणीनुसार आरोपीने त्याचे लाईव्ह लोकेशन शेअर करावं, असंही न्यायालयाने सांगितलं होतं. 6 मार्च रोजी सुशील कुमारला चार दिवसांसाठी जामीन मिळाला होता. त्यावेळी वडिलांच्या अंत्यविधीला जाण्याची परवानगी त्याला देण्यात आली होती.