Vinesh Phogat disqualified : ऑल्पिम्पिक (Olympics 2024 ) गोल्ड...कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न उराशी बाळगत भारतीय गटातील कुस्तीपटू विनेश फोगाट तिच्या 50 किलो वजनी गटातील कुस्तीच्या अंतिम सामन्यासाठी तयार होत असतानाच एक स्वप्नभंग करणारी बातमी समरो आली. अंतिम सामन्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच नियमानुसार करण्यात आलेल्या वजन चाचणीमध्ये विनेशचं वजन 100 ग्रॅमनं जास्त भरलं आणि त्यामुळं तिला अपात्र ठरवण्यात आलं. 


काय सांगतो स्पर्धेचा नियम? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्पर्धेच्या नियमांनुसार, स्पर्धेच्या (सामन्याच्या) दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावं लागतं. परंतु विनेशचं वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचं आढळून आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. विनेश फोगाटनं 50 किलो फ्रीस्टाइल गटात शानदार कामगिरी करताना अंतिम फेरी गाठली होती. तिनं क्युबाच्या युसनेलिस गुझमन लोपेझविरुद्ध 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला होता. ऑलिम्पिक कुस्तीमध्ये अंतिम फेरी गाठणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती. मात्र अंतिम सामन्याआधीच तिला अपात्र ठरवण्यात आलं आणि अनेकांचीच निराशा झाली. 


अंतिम फेरीच्या आदल्या रात्री नेमकं काय घडलं? 


इंडियन एक्स्प्रेसनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अनेक अडथळे ओलांडून अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेली विनेश मंगळवारी रात्रीच वजनाची निर्धारित मर्यादा ओलांडताना दिसली. तिचं वजन साधारण 2 किलो अधिक असल्याचं लक्षात येताच या कुस्तीपटूनं रात्री विश्रांतीसाठी वेळ न देता धावणं, दोरीच्या उड्या मारणं, सायकलिंग करणं इथपासून शक्य त्या सर्व पद्धतींनी प्रयत्न करत पात्र होण्यासाठी मेहनत घेतली. अतिशय मेहनत घेऊनही ती स्वत:ला सिद्ध करण्यात मात्र अपयशी ठरली. 


हेसुद्धा वाचा : 'शब्दात मांडता आलं असतं तर...', विनेश फोगाट Olympics मधून अपात्र ठरल्यानंतर PM मोदी भावूक


 


सूत्रांच्या माहितीनुसार विनेशची टीम आणि भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या वतीनंही तिला 100 ग्रॅम वजन कमी करण्यासाठीची अखेरची संधी देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली. पण, इथं मात्र नशीबानं या खेळाडूची साथ दिली नाही. 


वजनी गटात न बसण्याची विनेशची ही पहिलीच वेळ नाही. कारण, सहसा 53 किलो वजनी गटातून खेळणाऱ्या विनेशनं 50 किलो वजनी गटात स्थान मिळवण्यासाठीसुद्धा जीवाचा आटापिटा केला होता. ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठीचा प्रवासही तिच्यासाठी आव्हानात्मक ठरला होता, त्यामुळं विनेशला सुरुवातीपासूनच संघर्ष चुकला नाही. असं असताना आता कुठे तिला यशाचं शिखर जवळ दिसत असतानाच आणखी एक अडथळा आला आणि विनेशसह संपूर्ण भारताचं स्वप्न भंगलं. 


शक्त त्या सर्व पर्यायांची चाचपणी करा...


विनेशसंदर्भातील वृत्त समोर येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीनं या विषयाची दखल घेत IOA अध्यक्ष पीटी उषा यांच्याशी त्यांनी संवाद साधला. पीटी उषा यांच्याकडून या विषयावर आणि विनेशच्या धक्क्यानंतर भारताकडे कोणते पर्याय आहेत याबद्दल प्रथम माहिती घेतली. विनेशच्या प्रकरणात मदत करण्यासाठी सर्व पर्यायांची चाचपणी करण्याचे आदेश पंतप्रधानांच्या वतीनं गेण्यात आले असून विनेशला मदत होत असेल तर तिच्या अपात्रतेबद्दल तीव्र निषेध नोंदवावा, असंही त्यांनी पीटी उषा यांना सांगितलं.