Vinesh Phogat Big Decision After Olympics 2024 Disqualification: भारताच्या पॅरिस ऑलिम्पिक मोहिमेला बुधवारी सर्वात मोठा धक्का बसला. भारताची अनुभवी कुस्तीपटू विनेश फोगाटचं वजन 100 ग्रॅम अधिक भरल्याने सुवर्णपदकाच्या सामन्याआधीच तिला अपात्र ठरवण्यात आलं. विनेश फोगाटकडून भारताला सुवर्णपदकाची अपेक्षा होती. मात्र तिला अंतिम सामन्यासाठी मैदानातच उतरता आलं नाही आणि तिच्याबरोबरच 140 कोटी भारतीयांचं सोनेरी स्वप्न हवेत विरलं. या धक्कादायक घडामोडीनंतर अवघ्या काही तासांमध्ये भारताच्या या गुणी कुस्तीपटूने थेट निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. विनेशनेच सोशल मीडियावरुन यासंदर्भातील सूचक पोस्ट करत घोषणा केली आहे. विनेशचा हा निर्णय सर्वच कुस्तीप्रेमींसाठी फारच धक्कदायक आहे. 


खचून गेली विनेश


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

29 वर्षीय विनेश फोगाटने 50 किलो वजनी गटामध्ये दमदार कामगिरी करत थेट अंतिम फेरीत घडक मारली होती. विनेशबरोबर घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे भारतील क्रीडा क्षेत्राबरोबर राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रामधूनही प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यासारख्या बड्या नेत्यांपासून ते अभिनेता रणवीर सिंहपासून इतरही अनेक सेलिब्रिटींनी विनेशला आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, असं म्हणत धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र घडामोडींमुळे विनेश पूर्णपणे खचून गेली असून तिने थेट कुस्तीमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 


जाहीर केला मोठा निर्णय


भारतीय वेळेनुसार पहाटे 5 वाजून 17 मिनिटांनी विनेशने तिच्या एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन सूचक पोस्ट करत निवृत्तीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. "आई कुस्ती माझ्याविरुद्ध जिंकली... मी पराभूत झाले! मला माफ कर आई, तुझं स्वप्न, माझी हिंमत सारं काही तुटलं आहे. माझ्याकडे आता याहून अधिक ताकद राहिलेली नाही!" असं विनेशने म्हटलं आहे. तसेच याच पोस्टमध्ये पुढे विनेशने, "कुस्तीचा निरोप घेतेय... 2001-2024" असं म्हटलं आहे. म्हणजेच 2001 पासून सुरु केलेला कुस्तीमधील हा प्रवास मी 2024 मध्ये थांबवत आहे असं विनेशनला यामधून सूचित करायचं आहे. पोस्टच्या शेवटी तिने सर्व चाहत्यांची आणि भारतीयांची माफी मागितली आहे. "मी तुम्हा सर्वांची कायम ऋणी असेल. मला माफ करा," असं म्हणत विनेशने हात जोडल्याचे इमोजी वापरत दिलगीरी व्यक्त केली आहे.



कोणतंही पदक मिळणार नाही


महिला कुस्तीमध्ये ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठणारी पहिली महिला कुस्तीपटू ठरल्याचा विनेशचा आनंद क्षणभंगूर ठरला. विनेश अपात्र ठरल्याने तिला अंतिम सामना खेळता आला नाही. तिला कोणतेही पदक मिळणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. विनेशचं हे शेवटचं ऑलिम्पिक असेल अशी कुणकुण यापूर्वीच लागली होती. तिला सुरुवातीला 53 किलो वजनी गटातून पात्र होता न आल्याने तिने वजन कमी केलं आणि ती 50 किलो वजनी गटातून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली होती. मात्र दोन दिवस चालणाऱ्या कुस्तीच्या स्पर्धेदरम्यान विनेशचं वजन मर्यादेपेक्षा अधिक असल्याचं स्पष्ट झाल्याने तिला थेट अपात्र ठरवण्यात आलं.