मुंबई : टीम इंडियाने (Team India) आजच्याच दिवशी 15 वर्षांपूर्वी इतिहास रचला होता. महेंद्रसिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला (ICC World T20 Final 2007)  थरारक सामन्यात पराभूत करत वर्ल्ड कपवर (World Cup 2022) आपलं नाव कोरलं होतं. टीम इंडियाने अवघ्या 5 धावांनी हा सामना जिंकला होता. नवख्या असलेल्या जोगिंदर शर्माला (Joginder Sharma) दिलेली शेवटची आणि निर्णायक ओव्हर आणि मागील बाजूला श्रीसंथने (S Sreesanth) पकडलेला कॅचचा तो क्षण क्रिकेट चाहत्यांच्या अजूनही लक्षात आहे. वर्ल्ड कप विजयाच्या 15 वर्षानिमित्ताने भारतीय समर्थकांनी या आठवणीला उजाळा दिला आहे. (on this day ind vs pak 2007 final team india beat pakistan by 5 runs and win  t 20 world cup 15 years ago)


सामन्याचा धावता आढावा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाने पाकिस्तानला 158 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांना सुरुवातीपासून धक्के द्यायला सुरुवात केली. टी 20 मध्ये 158 धावांचं आव्हान अवघडं असं नव्हंत. 


अपवाद वगळता पाकिस्तानच्या इमरान नझीर आणि यूनुस खान या दोघांनी अनुक्रमे 33 आणि 24 धावांची खेळी करुन आपली जबाबदारी पार पाडली. कामरान अकमल, शोएब मलिक आणि शाहिद आफ्रिदी या तिकडीला भारतीय गोलंदाजांनी गुंडाळलं.


शेवटी शेवटी यासिर अरफात आणि सोहेल तनवीर या दोघांनी 15 आणि 12 धावांचं योगदान दिलं आणि माघारी परतले. एका बाजूला पाकिस्तानचे फलंदाज एकामागोमाग एक माघारीच जात होते. मात्र दुसऱ्या बाजुला मिस्बाह उल हक खिंड लढवत होता. 


आधीच वर्ल्ड कप फायलन मॅच ,त्यात इंडिया-पाकिस्तान सामना असं दुहेरी दबाव खेळाडूंवर होता. दोन्ही संघांना जिंकायचं होतं, मात्र वर्ल्ड चॅम्पियन कुणी एकमेव होणार होता. सामना रंगतदार स्थितीत शेवटच्या षटकापर्यंत पोहचला. 


आता वर्ल्ड कप फायनल सामन्यात शेवटची ओव्हर टाकायची म्हणजे प्रेशर नि फक्त प्रेशर. आरपी सिंह, श्रीसंथ आणि इरफान पठाण यांच्या कोट्यातील प्रत्येकी 4 ओव्हर टाकून झालेल्या. त्यामुळे आता हरभजनच्या कोट्यातील 1 ओव्हर शिल्लक होती. 


मात्र धोनीने भलंतच काही केलं. चक्क जोगिंदर शर्माला शेवटची ओव्हर दिली. जोगिंदर शर्माला ओव्हर दिलेली पाहून क्रिकेट चाहते जरा चक्रावलेच. मात्र धोनीने इथूनच आपल्यातला हटकेपणाची सुरुवात केली.


धोनीने जोगिंदरला विश्वासाने शेवटची ओव्हर दिली. पाकिस्तानला वर्ल्ड चॅम्पियन होण्यासाठी अवघ्या 13 धावा पाहिजे होत्या तर टीम इंडियाला फक्त 1 विकेट. मिस्बाह आणि मोहम्मद आसिफ मैदानात होते. 


असा रंगला शेवटच्या ओव्हरचा थरार 


जोगिंदरने पहिलाच बॉल वाईड टाकला. जोगिंदरने पुढचा डॉट बॉल टाकला. मात्र मिस्बाहने दुसऱ्याच बॉलवर खणखणीत सिक्स ठोकला. आता आपणच जिंकणार असा विश्वास पाकिस्तानी चाहत्यांच्या डोळ्यात दिसत होता. मात्र कुणी हा विचार सुद्धा केला नसेल की पाकिस्तान हा सामना हरणार आहे. 


आता पाकिस्तानला 4 बॉलमध्ये अवघ्या 6 धावा हव्या होत्या. मिस्बाह सेट होता. त्यामुळे त्यासाठी फक्त 1 शॉटचा खेळ होता. मात्र पुढे जे झालं त्याची नोंद इतिहासात करण्यात आली.  



मिस्बाहने तिसऱ्या बॉलवर पॅडल स्वीप मारला. धोनीने बाउंड्री ऐवजी शॉट फाईन लेगला श्रीसंथला उभं केलं होतं. मिस्बाहने मारलेला बॉल श्रीसंथने झेलला. यासह टीम इंडियाने 5 धावांनी वर्ल्ड कप जिंकला. यासह टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन ठरली. 


रोहित शर्मा इतिहास घडवणार?


रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे सदस्य होते. आता अवघ्या काही दिवसांवर वर्ल्ड कप 2022 येऊन ठेपला आहे. रोहित शर्मा या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर दिनेश कार्तिकही संघाचा भाग आहे. त्यामुळे15 वर्षांपूर्वी केलेला कारनामा रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया करणार का, अशी चर्चाही यानिमित्ताने सुरु आहे.