Ind Vs Eng: इंग्लंडच्या फलंदाजांची बुमराहसमोर शरणागती, डाव 110 धावांवर आटोपला
पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवत इंग्लंडला 110 धावांवर रोखलं.
Ind Vs Eng: तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांचं वर्चस्व दिसलं. पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवत इंग्लंडला 110 धावांवर रोखलं. इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी 111 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताकडून जसप्रीत बुमराहने 6, मोहम्मद शमीने 3 आणि प्रसिध क्रिष्णाने 1 गडी बाद केला.
इंग्लंडचा डाव
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि इंग्लंडला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडने अक्षरश: नांगी टाकली. बुमराहने पहिल्या षटकातच जेसन रॉयला त्रिफलाचित करून इंग्लंडला धक्का दिला. जेसन रॉयला खातंही खोलता आलं नाही. त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांची घसरगुंडी सुरु झाली. जॉनी बेअरस्टो 7, जो रूट 0, बेन स्टोक्स 0, जोस बटलर 30, लियाम लिविंगस्टोन 0, मोईन अली 14, डेविड विले 21, क्रेग ओव्हरटन 8, ब्रायडन कर्स 15 या धावसंख्येवर बाद झाले. भारताकडून जसप्रीत बुमराहने 6, शमीने 3, तर प्रसिध कृष्णाने एक गडी बाद केला.
प्लेइंग इलेव्हन
टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल आणि प्रसिद्ध कृष्णा.
टीम इंग्लंड: जोस बटलर (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स, लियाम लिविंगस्टोन, मोईन अली, डेविड विले, क्रेग ओव्हरटन, ब्रायडन कार्स, रीस टॉपले.