लंडन : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा पराभव झाला. शेवटच्या इनिंगमध्ये १९४ रनचा पाठलाग करताना भारताची बॅटिंग गडगडली. या मॅचमध्ये विराट कोहली वगळता दुसऱ्या कोणत्याही बॅट्समनला चमकदार कामगिरी करता आली नाही. या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये कोहलीनं १४९ रन आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ४९ रनची खेळी केली. भारताच्या या कामगिरीवर माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसंच सध्याच्या खेळाडूंमधला फक्त अजिंक्य रहाणेच माझ्याकडे सल्ला घ्यायला येतो, असं गावसकर म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधीच्या पिढीमधले सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विरेंद्र सेहवाग, लक्ष्मण हे खेळाडू परदेश दौऱ्यावेळी माझा सल्ला घ्यायला यायचे. पण ही पिढी वेगळी आहे. त्यांच्याकडे वेगवेगळे प्रशिक्षक आहेत. अजिंक्य रहाणेच माझ्याकडे काहीवेळा येतो, असं वक्तव्य गावसकर यांनी केलं.


इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजआधी भारतीय टीमनं सराव सामने न खेळण्यावरही गावसकर यांनी नाराजी व्यक्त केली. याचबरोबर शिखर धवनवरी त्यांनी टीका केली आहे. पहिल्या टेस्टमध्ये धवननं २६ आणि १३ रनची खेळी केली होती. आत्तापर्यंत ज्यामुळे यश मिळालं तसाच धवन खेळत आहे. वनडेमध्ये असे शॉट खेळल्याचा तुम्हाला फायदा होईल कारण तेव्हा स्लिपमध्ये खेळाडू नसतात पण टेस्टमध्ये असे शॉट खेळले तर तुम्ही विकेट गमावणारच आहात. या तंत्रामुळे धवन परदेशामध्ये संघर्ष करेल, असं गावसकर म्हणाले.


हार्दिक-कपिलची तुलना नको


हार्दिक पांड्याची कपिल देव यांच्याबरोबर होणारी तुलनाही गावसकर यांना पटत नाही. कपिल देव हा एका पिढीतला खेळाडू नाही तर १०० वर्षांमधून एकदाच होणारा खेळाडू आहे. त्यामुळे त्याची आणि कपिल देवची तुलना चुकीचं असल्याची प्रतिक्रिया गावसकर यांनी दिली आहे.


पुजाराला बाहेर ठेवणं चूक


पहिल्या टेस्टमध्ये चेतेश्वर पुजाराला टीमबाहेर ठेवणं चुकीचा निर्णय होता, असं गावसकर म्हणाले. पुजाराकडे टेस्ट क्रिकेटसाठी लागणारं तंत्र आणि संयम आहे. त्यामुळे लॉर्ड्स टेस्टसाठी त्याला संधी देण्यात यावी. लॉर्ड्सच्या खेळपट्टीवर गवत नसेल तर मी उमेश यादवऐवजी पुजाराला संधी देण्यात यावी, असा सल्ला गावसकर यांनी दिला आहे.