पाकिस्तानमध्येही विराटची धूम, चाहत्याकडून निमंत्रण
भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपल्या अप्रतिम खेळाने आणि फॉर्मने जगभरातल्या अनेक क्रिकेट चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.
लाहोर : भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपल्या अप्रतिम खेळाने आणि फॉर्मने जगभरातल्या अनेक क्रिकेट चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. त्यात काही पाकिस्तानी क्रिकेट चाहतेही आहेत. त्यातल्याच एका पाकिस्तानी फॅनने लाहोरमध्ये गदाफी स्टेडियमवर पाकिस्तान-श्रीलंकेत सुरु असलेल्या सामन्यादरम्यान विराटसाठी एक संदेश लिहिला. विराट, पाकिस्तानात ये, इथे क्रिकेट खेळ, मी तुझा मोठा फॅन आहे, अशी विनंतीचं त्यानं केली. पाकिस्तानी चाहत्याचा हातात पोस्टर असलेला हा व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे.
तणावपूर्ण संबंधांमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विदेशीय सीरिज होत नाहीत. हे दोन्ही देश फक्त आयसीसीची स्पर्धा आणि आशिया कपमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात. जगातला सर्वोत्तम बॅट्समन म्हणून लौकिक मिळवलेल्या विराटने अजून पाकिस्तानच्या जमिनीवर एकही मॅच खेळलेली नाही.
भारताने पाकिस्तानविरुद्ध शेवटची मॅच वर्ल्ड कपमध्ये खेळली होती. विराटने पाकिस्तानविरुद्ध १३ वनडे मॅच खेळल्या. यात त्याने ४८.७२ च्या सरासरीने ५३६ रन केले आहेत. पाकिस्तानविरुद्ध विराटचा सर्वाधिक स्कोअर १८३ रन आहे. नुकताच इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध विराटने ७७ रनची खेळी केली होती.
श्रीलंकेची टीम ही पाकिस्तानच्या दौऱ्यावर होती. २००९ सालानंतर पहिल्यांदाच एखाद्या टीमने पाकिस्तान दौरा करुन वनडे आणि टी-२० सीरिज खेळली. वनडे सीरिजमध्ये पाकिस्तानचा २-०ने आणि टी-२० सीरिजमध्ये श्रीलंकेचा ३-०ने विजय झाला. २००९ साली पाकिस्तानमध्ये श्रीलंकेच्या टीमवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर कोणत्याही टीमने पाकिस्तानचा पूर्ण दौरा केला नव्हता.