`...म्हणून आम्हीच सामान उचलून ठेवलं`; विमानतळावर फजिती झाल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूने सांगितलं सत्य
Pak vs Aus : पाकिस्तानी क्रिकेट संघाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये खुद्द पाकिस्तानी क्रिकेटर्स त्यांचे सामान घेऊन जाताना दिसत होते. पण आता पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने या फोटोमागचे रहस्य उघड केले आहे.
Pak vs Aus : पाकिस्तान क्रिकेट संघ तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. मात्र ऑस्ट्रेलियात पोहोचताच पाकिस्तानी क्रिकेटपटूंची फजिती झाल्याचे पाहायला मिळालं. ऑस्ट्रेलियात विमानतळावर पोहोचल्यावर पाकिस्तानी दूतावास किंवा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा कोणताही अधिकारी पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी आला नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंना त्यांचे सामान स्वतः उचलून ट्रकमध्ये भरावे लागले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. काही चाहते पाकिस्तान क्रिकेट संघाच्या खेळाडूंची खिल्ली उडवत आहेत. तर काहीनीं त्यांना पाठिंबा दिला आहे.
पाकिस्तानी क्रिकेटपटूंची ऑस्ट्रेलियात फजिती
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला 14 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिला कसोटी सामना 14 ते 18 डिसेंबर दरम्यान पर्थ येथे खेळवला जाणार आहे. पाकिस्तानला 26 ते 30 डिसेंबर दरम्यान मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळायचा आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना सिडनी येथे 3 ते 7 जानेवारी 2024 मध्ये खेळवला जाईल. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचे खेळाडू ऑस्ट्रेलियाला पोहोचताच विमानतळावर त्यांचे सामान ट्रकमध्ये भरत आहेत.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी स्वतःहून सामान ट्रकमध्ये चढवल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर काही लोक प्रश्न विचारत आहेत. जेव्हा पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे विमान ऑस्ट्रेलियात आले तेव्हा पाकिस्तानी दूतावास किंवा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे कोणताही अधिकारी विमानतळावर का उपस्थित नव्हते? असा सवाल चाहत्यांकडून विचारला जात आहे.
शाहीन आफ्रिदीने दिली प्रतिक्रिया
शाहीन आफ्रिदीने रविवारी कॅनबेरा येथे सराव सत्रापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना या सगळ्या घटनेबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. पुढचे फ्लाइट पकडण्यासाठी आमच्याकडे फक्त 30 मिनिटे शिल्लक होती. तिथे सामान नेण्यासाठी दोनच लोक होते. म्हणूनच आम्ही त्यांना मदत करत होतो. आम्हाला काम लवकर पूर्ण करायचे होते जेणेकरून वेळ वाचेल. आम्ही आमच्या टीमला कुटुंब म्हणतो आणि कुटुंबाप्रमाणे एकमेकांना मदत करतो,' असे स्पष्टीकरण शाहीन आफ्रिदीने दिलं आहे.
दरम्यान, पाकिस्तान संघाने 1999 ते 2019 पर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये सलग 14 कसोटी सामने गमावले आहेत. पाकिस्तानच्या संघाने कोणत्याही देशात सलग सर्वाधिक कसोटी सामने गमावण्याचा हा लज्जास्पद विक्रम आहे. 1999 मध्ये झालेल्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 3-0 ने पराभव केला होता. यानंतर ऑस्ट्रेलियाने 2004 मध्ये पाकिस्तानचा 3-0, 2009 मध्ये 3-0, 2016 मध्ये पुन्हा 3-0 आणि 2019 मध्ये पुन्हा 2-0 असा पराभव केला होता.