नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी)ने पाकिस्तानचा ऑफ स्पिनर मोहम्मद हाफीज याच्यावर बंदी घातली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चुकीच्या पद्धतीने बॉलिंग करत असल्याचा ठपका ठेवत मोहम्मद हाफीज याच्यावर बंदी घालण्यात आली आहे. एका स्वतंत्र चौकशीनंतर आयसीसीने हा निर्णय घेतला आहे.


एक चाचणी घेण्यात आली होती त्यामध्ये मोहम्मद हाफीज याचा हात बॉलिंग करताना १५ डिग्रीपेक्षा अधिक वळतो असं समोर आलं. आयसीसीच्या नियमापेक्षा अधिक अंतरात हात वळत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.


आयसीसीने म्हटलं की, "आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने गुरुवारी पाकिस्तानचा ऑफ स्पिनर मोहम्मद हाफीजची एक स्वतंत्र चाचणी घेण्यात आळी होती. या चाचणीत हाफीजची अॅक्शन चुकीची असल्याचं समोर आलं. त्यामुळे आयसीसीने त्याच्यावर कारवाई केली आहे.


हाफीजवर बंदी घातली आहे मात्र, नियम ११.५ नुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या परवानगीने हाफीज पीसीबीच्या स्थानिक क्रिकेटमध्ये बॉलिंग करु शकतो.


मोहम्मद हाफीज हा श्रीलंकेविरोधात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वन-डे मॅचमध्ये चुकीची बॉलिंग टाकत असल्याचं समोर आलं. ही मॅच १८ ऑक्टोबर रोजी आबुधाबी येथे खेळण्यात आली होती. त्यानंतर १ नोव्हेंबर रोजी लफबरो युनिव्हर्सिटीमध्ये त्याची स्वतंत्र चाचणी घेण्यात आली.


यापूर्वीही घातली होती बंदी


मोहम्मद हाफीज याच्यावर नोव्हेंबर २०१४मध्ये न्यूझीलंड विरोधात टेस्ट सीरिजमध्ये आक्षेपार्ह बॉलिंग टाकत असल्याचा ठपका ठेवत बंदी घालण्यात आली होती.


त्यानंतर एप्रिल २०१५मध्ये बॉलिंग अॅक्शनमध्ये बदल करत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. मग पुन्हा काही महिन्यांनी श्रीलंकाविरोधात खेळताना त्याच्या बॉलिंगवर आक्षेप घेत बंदी घातली.