World Cup 2019: पाकिस्तानकडून बांगलादेशचा ९४ धावांनी पराभव
शाकिब अल हसन (६४) वगळता बांगलादेशच्या अन्य फलंदाजांना अपयश आले.
लॉर्डस: पाकिस्तानने शुक्रवारी लॉर्डसवर झालेल्या सामन्यात बांगलादेशचा ९४ धावांनी पराभव करत विश्वचषक स्पर्धेतील प्रवासाचा गोड शेवट केला. मात्र, सरासरी रनरेटच्या गणितामुळे पाकिस्तानचे उपांत्य फेरीत जाण्याचे मनसुबे धुळीला मिळाले. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशसमोर विजयासाठी ३१६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ २२१ धावांपर्यंतच मजल मारु शकला.
शाकिब अल हसन (६४) वगळता बांगलादेशच्या अन्य फलंदाजांना अपयश आले. मात्र, शाकीब अल हसन माघारी परतल्यानंतर बांगलादेशचा डाव गडगडला. पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीने बांगलादेशचा निम्मा संघ गारद केला. त्याने ३५ धावांत ६ बळी घेतले.
तत्पूर्वी पाकिस्तानने आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इमाम उल-हक, बाबर आझम आणि इमाद वासिम या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर पाकिस्तानने ३१५ धावांपर्यंत मजल मारली. बाबरने अर्धशतकी खेळी करून नवा विक्रमाला गवसणी घातली. विश्वचषक स्पर्धेच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या पाकिस्तानी फलंदाजाचा विक्रम त्याने नावावर केला. यापूर्वी हा विक्रम जावेद मियादाँद यांच्या नावावर होता.
पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यासाठी अशक्य समीकरणांची जुळवाजुळव करावी लागणार होती. यापैकी पहिल्या समीकरणानुसार पाकला ५० षटकांत किमान ३५० धावा करून बांगलादेशचा डाव ३९ धावांमध्ये गुंडाळावा लागणार होता. तर दुसऱ्या समीकरणानुसार पाकिस्तानला ५० षटकांमध्ये ४०० धावा कराव्या लागणार होत्या आणि बांगलादेशचा डाव ८४ धावांमध्ये गुंडाळावा लागणार होता. तर तिसऱ्या समीकरणानुसार पाकिस्तानला ४५० धावा करून बांगलादेशला १२९ धावांवर गुंडाळावे लागणार होते. त्यामुळे पाकिस्तानची विश्वचषकातील एक्झिट जवळपास निश्चित मानली जात होती.
मात्र, पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने या सामन्यापूर्वी आम्ही ५०० धावांचा डोंगर उभारू अशा वल्गना केल्या होत्या. आजच्या सामन्यानंतर तो अपेक्षेप्रमाणे तोंडघशी पडला.