PCB Chief Selector: आगामी वनडे वर्ल्ड (World Cup 2023) कपच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच संघ तयारी करत असल्याचं पहायला मिळतंय. टीम तयार करण्याबरोबरच व्यवस्थापकांची देखील हकालपट्टी होताना दिसत आहे. तर नव्या चेहऱ्यांना संधी मिळत असल्याचं दिसत आहे. वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान संघ (Pakistan Cricket Team) भारतात येणार असल्याचं पाकिस्तान सरकारने नुकतंच जाहीर केलं होतं. अशातच आता पाकिस्तानने मोठा डाव खेळला आहे. त्यामुळे आता टीम इंडियाचा सावध खेळ करत पाकिस्तानचा पत्ता कट करावा लागणार आहे.


नवा चीफ सिलेक्टर कोण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) सोमवारी माजी कर्णधार इंझमाम-उल-हक (Inzamam ul Haq) याची दुसऱ्यांदा मुख्य निवडकर्ता म्हणून पुन्हा नियुक्ती केली. 2016 ते 2019 या काळात  इंझमाम-उल-हक पाकिस्तान संघाचा चीफ सिलेक्टर होता. त्यानंतर आता पुन्हा वर्ल्ड कपच्या तोंडावर पाकिस्तानने मोठा निर्णय घेत इंझमाम-उल-हक याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आता 22 ऑगस्टपासून अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी इंझमाम-उल-हक संघ निवडू शकतो.



पीसीबीने सोशल मीडियावर ट्विट करून याबाबत माहिती दिली. पुन्हा एकदा इंझमाम-उल-हकची राष्ट्रीय पुरुष संघाचा मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचं पीसीबीकडून सांगण्यात आलं. इंझमाम-उल-हकच्या (Inzamam Ul Haq) कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने 1992 साली पाकिस्तानला वर्ल्ड कप जिंकवण्यात मोलाची भूमिका साकारली होती. कसोटी सामन्यात इंझमामला तोड नव्हता. 120 कसोटी सामन्यांच्या 200 डावांमध्ये 49.6 च्या सरासरीने 8830 धावा केल्या आहेत. तर कसोटीत 25 शतके आणि 46 अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत. त्याचबरोबर एकदिवसीय सामन्यांच्या 350 डावांमध्ये त्याने 39.5 च्या सरासरीने 11739 धावा केल्या आहेत.


काय म्हणाला इंझमाम-उल-हक?


राष्ट्रीय पुरुष निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती होणं ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मला हे पद दिल्याबद्दल मी झका अश्रफ यांचा आभारी आहे. चेअरमन माजी खेळाडूंना क्रिकेटच्या बाबतीत सहभागी करून घेत आहेत हे पाहणं आश्चर्यकारक आहे. मी याआधी या भूमिकेत काम केलं आहे आणि मी पुन्हा एकदा यात काम करण्यास उत्सुक असल्याचं इंझमाम-उल-हक याने म्हटलं आहे.


पाकिस्तानमध्ये निवड समितीचे नेतृत्व करणं हे आधीच कठीण काम आहे, परंतु यावेळी आशिया चषक आणि आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासह ते अधिक आव्हानात्मक असणार आहे. पण, मला माहित आहे की मी ही भूमिका साकारू शकेन आणि मी मागच्या वेळेपेक्षा चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन. वेळेची कमतरता असूनही आम्ही सर्वोत्तम संभाव्य बाजू जाहीर करू, असं इंझमाम-उल-हक याने नियुक्तीनंतर म्हटलं आहे.