Inzamam ul Haq On PCB : जगातील गरीब क्रिकेट बोर्डापैकी एक म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड... पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (Pakistan Cricket Board) गेल्या काही महिन्यांपासून वादात सापडल्याचं पहायला मिळतंय. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला लाजीरवाणा पराभव स्विकारावा लागला. त्यानंतर आता पीसीबीमध्ये मोठे बदल झाले. मात्र, आता अलीकडील खराब निकालांमुळे मोहम्मद हाफिजला (Muhammad Hafeez) संघ संचालकपदावरून हटवण्यात आलं आहे. अशातच आता याच मुद्द्यावरून पाकिस्तानचा माजी स्टार कॅप्टन इंझमाम-उल-हकने (Inzamam ul Haq) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला घरचा आहेर दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय म्हणाला इंझमाम-उल-हक ?


ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यानंतर मोहम्मद हाफिजला संघ संचालकपदावरून हटवण्यामागे आणि मुख्य निवडकर्ता वहाब रियाझला कायम ठेवण्यामागील कारण मला कोणी समजावून सांगू शकेल का? असा सवाल इंझमाम-उल-हकने उपस्थित करून मोहम्मद हाफीजची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर  या दोघांची एकाचवेळी नियुक्ती करण्यात आली नव्हती आणि त्यांना समान जबाबदारी देण्यात आली नव्हती, मग केवळ हाफिजलाच का जबाबदार धरण्यात आलं? वहाब रियाजला का नाही? असा सवाल इंझमाम-उल-हकने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला विचारला आहे.


पीसीबीचे अध्यक्षपद हे अत्यंत आदरणीय आहे यात शंका नाही, त्यामुळे माजी कर्णधार आणि माजी दिग्गजांनाही बोर्डाच्या उच्च पदाधिकाऱ्यांकडून समान आदर मिळायला हवा नाही का? असा सवाल त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांना विचारला आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत 0-3 आणि न्यूझीलंडविरुद्धच्या टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय मालिकेत 1-4 अशा फरकाने पाकिस्तानला पराभव स्विकारावा लागला होता. त्यानंतर पीसीबीमध्ये अंतर्गत राजकारणास सुरुवात झाली होती. 


दरम्यान, न्यूझीलंड क्रिकेट संघ लवकरच पाकिस्तानविरुद्ध टी-20 मालिका खेळताना दिसणार आहे. 18 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या या मालिकेपूर्वी न्यूझीलंडची सुरक्षा टीम पाकिस्तानमध्ये पोहोचली आहे. त्यात न्यूझीलंड क्रिकेटचे दोन सदस्य आणि एका स्वतंत्र सुरक्षा तज्ज्ञाचा समावेश आहे. सुरक्षा टीम सामन्यांची ठिकाणं, खेळाडू जिथं मुक्काम करतील अशा हॉटेलांना भेट देतील आणि संघातील सदस्यांच्या सुरक्षा योजनेबाबत सरकार आणि सुरक्षा अधिकाऱ्यांकडून माहिती घेतील, असं पीसीबीकडून सांगण्यात आलंय.