Wasim Akram On Babar Azam: भारतामधील वर्ल्ड कप 2023 च्या पर्वानंतर पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझमने संघाचं नेतृत्व सोडलं. कसोटी, एकदिवसीय क्रिकेट आणि टी-20 मधील कर्णधारपद सोडण्याचा निर्णय बाबरने घेतला. 1992 साली वर्ल्ड कपवर नाव कोरणाऱ्या पाकिस्तानी संघाला 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये सेमीफायलनही गाठता आली नाही. पाकिस्तानी संघाची कामगिरी फारच सुमार झाली. सध्या पाकिस्तानी संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. याच पार्श्वभूमीवर आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने बाबर आझमला फलंदाजीसंदर्भात एक अजब सल्ला दिला आहे.


बाबर आणि पाकिस्तानची सुमार कामगिरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाबरच्या नेतृत्वाखाली भारतात वर्ल्ड कप खेळताना पाकिस्तानी संघाला 9 साखळी सामन्यांमध्ये 9 गुणच मिळवता आले. 4 सामने पाकिस्तानने जिंकले तर 5 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला. पाकिस्तानी संघाचा कर्णधार राहिलेल्या बाबरलाही आपल्या फलंदाजीची छाप पाडता आली नाही. 40 च्या सरासरीने बाबरने 9 सामन्यांमध्ये केवळ 320 धावा केल्या. यात त्याच्या 4 अर्धशतकांचा समावेश होता. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दौऱ्यामध्ये बाबर केवळ फलंदाज म्हणून संघात कायम आहे. तो तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळाडू म्हणूनच संघाबरोबर असेल. मात्र दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट लीगमध्ये बाबर पेशावर झाल्मीचं नेतृत्व करणार आहे. 


वसीम अक्रमचा सल्ला


मात्र पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने बाबर आझमला लीग स्पर्धांमध्ये कोणत्याही संघाचं नेतृत्व तू करु नकोस असा सल्ला दिला आहे. हा सल्ला अक्रमने नेमका का दिला याबद्दलची माहिती त्याने 'स्पोर्टकिडा'ला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.


तिथं कर्णधार होऊ नकोस


"मी काही वर्षांपूर्वी बाबर आझमला एक सल्ला दिला होता. लीग क्रिकेटमध्ये कर्णधारपद स्वीकारु नकोस. तू मोठा खेळाडू आहेस. पैसे घे, खेळ, धावा कर आणि घरी जा. एकानंतर दुसरी मालिका असाच खेळत राहा. पाकिस्तानचं कर्णधारपद समजू शकतो पण लीग स्तरावरील नेतृत्व म्हणजे कारण नसताना डोक्याला ताण देणारं असतं," असं अक्रमने सांगितलं. कराची किंग्जच्या संघासाठी काम करताना अक्रमने बाबर आझमबरोबर काम केलेलं. 


बाबरची दमदार कामगिरी


कराची किंग्जने बाबर आझमच्या मोबदल्यात पेशावर झाल्मी संघाबरोबर खेळाडूंची आदलाबदल केलेली. पेशावरने हैदर अली आणि शोएब मलिक या खेळाडूंच्या मोबदल्यात बाबरची देवाण-घेवाण केलेली. पेशावरचा संघ पाकिस्तानी क्रिकेट लीगच्या 2022-2023 च्या पर्वात चौथ्या स्थानी राहिला. लाहोर कलंदरच्या संघाने बाबरच्या नेतृत्वाखालील संघाला एलिमिनेटर 2 मध्ये पराभूत केलं होतं. या पर्वात बाबरने 522 धावा केल्या.