बाळाला घेऊन क्रिकेटच्या मैदानात उतरणारी ही खेळाडू कोण?
आज भारत विरूद्ध पाकिस्तानी महिला टीम एकमेकांविरोधात मैदानात उतरल्या आहेत
मुंबई : आयसीसी महिलांच्या क्रिकेट वर्ल्डकपला 4 मार्चपासून सुरुवात झाली आहे. यामध्ये आज भारत विरूद्ध पाकिस्तानी महिला टीम एकमेकांविरोधात मैदानात उतरल्या आहेत. या महामुकाबल्यामध्ये एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो आहे पाकिस्तानी कर्णधार बिस्माह मारूफ हिचा. तिच्या या फोटोने सर्वांचं मन जिंकून घेतलं आहे.
हा फोटो पाहिल्यानंतर सर्वांकडून बिस्माह मारूफचं कौतुक होतंय. सामना खेळण्यापूर्वी बिस्माह तिच्या 7 महिन्यांच्या मुलीला घेऊन स्टेडियममध्ये पोहोचली होती. तिची मुलगी लाल रंगाच्या कपड्यांमध्ये खूप गोड दिसत होती.
बिस्माह मारूफचा मुलीसोबतचा फोटो आयसीसीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केलाय. या फोटोवर अनेक कमेंट्स आल्या असून बिस्माह मारूफच्या पॅशनचं सगळीकडे कौतुक होताना दिसतंय.
28 नोव्हेंबर 2018 साली बिस्माहने अबरार अहमद नावाच्या व्यक्तीशी लग्नगाठ बांधली. अबरार पेशाने सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. क्रिकेटर होणं बिस्माहचं स्वप्न नव्हतं तर डॉक्टर बनण्याची तिची इच्छा होती.
30 वर्षांची बिस्माह मारूफ स्पिन ऑलराऊंडर आहे. तिने गेल्या वर्षी 30 ऑगस्टला मुलीला जन्म दिला. यानंतर ती काही काळ क्रिकेटपासूनही दूर होती. तर आज ती स्टेडियममध्ये मुलीसोबत दिसली.