MS Dhoni : भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) माजी कर्णधार आणि विकेटकिपर महेंद्रसिंग धोणी (MS Dhoni) आजही क्रिकेट जगतातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गणला जातो. स्टम्पच्या मागे धोणी इतका चपळ विकेटकिपर आजही शोधून सापडणार नाही. 15 ऑगस्ट 2020 ला धोणीने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण आजही युवा विकेटकिपर धोणीला आपला आदर्श मानतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचा आरोप
असं असलं तरी पाकिस्तानचा (Pakistan) माजी कर्णधार राशिद लतीफने (Rashid Latif) मात्र धोणीच्या विकेटकिपिंगवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्याच्या मते धोणीची विकेटकिपिंग वाईट होती. राशिद लतीफच्या या वक्तव्याने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. 


राशिद लतीफने पाकिस्तानसाठी दीर्घकाळ विकेटकिपिंग केली आहे. धोणीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत जवळपास 21 टक्के झेल सोडले आहेत, हा एक मोठा आकडा असल्याचं राशिदने म्हटलं आहे. धोणीच्या चांगल्या कामगिरीची चर्चा होते, तर त्याने केलेल्या खराब कामगिरीचीही चर्चा व्हायला हवी असं राशिदचं म्हणणं आहे. 


भारताच्या माजी कर्णधाराचा रेकॉर्डवर एक नजर टाकली तर त्याने कसोटीत 256 झेल घेतले आणि 38 स्टंपिंग केल्या आहेत. वनडेमध्ये 321 झेल आणि 123 स्टंपिंग आहेत. त्याच वेळी, टी-20 मध्ये धोनीने 57 झेल घेतले आणि 34 वेळा स्टंप केलं आहे.


'धोणीच्या संपूर्ण कामगिरीचा विचार करायला हवा'
फलंदाज आणि विकेटकिपर म्हणून धोणीची क्रिकेट कारकिर्द नक्कीच उल्लेखनीय आहे. पण आकडेवारीच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याचं कॅच सोडण्याचं प्रमाण 21 टक्के इतकं आहे. आणि ते भरपूर आहे. सर्वजण त्याने घेतलेल्या कॅचची चर्चा करतात, पण सोडलेल्या कॅचबद्दल कोणीही बोलत नाही. त्याने अनेक स्टम्पिंगही मिस केल्या आहेत. इतकंच नाही तर त्याने अनेकवेळा बाय रन्सही दिले आहेत. तर अनेकवेळा रनआऊटच्या संधीही गमावल्या आहेत. हे सर्वांचा विचार केला तर धोणीच्या कामगिरीचा अंदाज येईल असं राशिदने स्पष्ट केलं आहे. 


धोणीला जगातील सर्वोत्तम विकेटकिपर म्हणून ओळखलं जातं. धोणीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं असलं तरी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी तो आजही खेळतो. 


सर्वोत्तम विकेटकिपर कोण?
जगातील सर्वोत्तम विकेटकिपर कोण हा प्रश्न विचारला असता राशिद लतीफने दक्षिण आफ्रिकेचा विकेटकिपर क्विंटन डि कॉकचं (quinton de kock) नाव घेतलं. क्विंटन गेल्या 15 वर्षातली सर्वोत्तम विकेटकिपर असल्याचं राशिदने म्हटलं आहे.