शाहीद आफ्रीदीच्या आत्मचरित्रात खऱ्या वयाबद्दल खुलासा
या नव्या जन्मतारखेनुसार आफ्रिदीचे सध्याचे वय हे ४४ आहे. तरीही क्रिकेटप्रेमींना त्याच्या खऱ्या वयाबाबत अजूनही साशंकता आहेच.
ब्युरो रिपोर्ट, झी २४ तास, मुंबई : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रीदी हा भारतात नेहमी ट्रोलचा विषय ठरतो. कधीतरी वादग्रस्त विधान करुन तो स्वत:वर टीका ओढवून घेतो तर कधी विनाकारण ही त्याच्यावर टीका होत असते. आताही त्याच्या आत्मचरित्रामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. त्याने आत्मचरित्रात आपल्या खऱ्या जन्मतारखेचा उल्लेख केला आणि क्रिकेटमधील एका मोठ्या रहस्यावरील पडदा दूर झाला आहे. या नव्या जन्मतारखेनुसार आफ्रिदीचे सध्याचे वय हे ४४ आहे. तरीही क्रिकेटप्रेमींना त्याच्या खऱ्या वयाबाबत अजूनही साशंकता आहेच.
शाहिद आफ्रिदी...पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू....पाकिस्तानचा एकेकाळचा हुकमी एक्का...त्याचं वय हे क्रिकेटचाहत्यांसाठी नेहमीच एक रहस्य राहिले आहे. क्रिकेटप्रेमी जेवढे त्याच्या खेळाबाबत चर्चा करतात तेवढीच खमंग चर्चा आणि हास्यविनोद त्याच्या वयाबाबतही करतात. त्याला कारणही तसेच आहे. कारण या पठ्ठ्याने आपले वय अनेकदा बदलले आहे..त्यामुळे चर्चा तर होणारच..
क्रिकेटच्या एका अधिकृत वेबसाईटवर तो १ मार्च १९८० जन्मला असून त्यानुसार तो सध्या ३९ वर्षांचा असल्याचं दाखवले जात आहे. मात्र आता त्याने 'गेम चेंजर' या आत्मचरित्रात आपला जन्म हा १९७५ ला झाला असल्याचे लिहिले आहे. या नव्या जन्मतारखेनुसार सध्याचे त्याचं वय हे ४४ होते. तो जर खरेच १९७५मध्ये जन्मला असेल तर त्याने वयाच्या १६वर्षी नौरेबिविरुद्ध झळकावलेल्या शतकाचा विक्रम खोटा ठरतो. कारण त्यावेळी तो प्रत्यक्षात २१ वर्षांचा होता. मात्र यावरही कडी म्हणजे त्यावेळी आपण त्यावेळी १९ वर्षांचा होतो असा त्यानं उल्लेख केला आहे. विशेष म्हणजे तो विक्रम तब्बल १७ वर्षे त्याच्या नावे होता. आफ्रिदी जर १९७५मध्ये जन्मला असेल तर त्यानं पाकिस्तानकडून अखेरचा सामना ३६ नव्हे तर ४१ वर्षी खेळला असे म्हणावं लागेल.
यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये आफ्रिदीने आपल्याला एकप्रकारे फसवल्याची भावना निर्माण झाली आहे. नव्या जन्मतारखेच्या खुलाशामुळे आफ्रिदी आता थेट पाच वर्षांनी मोठा झाला आगे. त्याने आत्मचरित्रात जन्मतारखेचा उल्लेख केला मात्र तारीख आणि महिन्याबाबत काहीही उल्लेख केलेला नाही. दरम्यानच्या काळात त्याने अनेकदा आपलं वय बदलले. यामुळे आफ्रीदीचे खरं वय हे अजूनही क्रिकेटचाहत्यांसाठी न उलगडलेले रहस्यचं आहे असेच म्हणावे लागेल.