World Cup 2023 : पाकिस्तानचा संघ (Pakistan Team) 2023 मध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकातून (ICC World Cup 2023) बाहेर पडू शकतो. पाकिस्तानशिवाय श्रीलंका, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेलाही या स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका आहे. आयसीसीच्या नियमांनुसार, क्रिकेट विश्वचषक सुपर लीगमध्ये पहिल्या सात स्थानांवर असलेला संघ आणि स्पर्धेचे यजमानपद मिळवणारा संघ थेट विश्वचषकासाठी पात्र ठरेल. उर्वरित पाच संघांना सहयोगी देशांसोबत पात्रता फेरी खेळावी लागेल आणि येथील पहिले दोन संघ विश्वचषकात प्रवेश करतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसीच्या (ICC) एकदिवसीय विश्वचषक सुपर लीगमध्ये एकूण 13 संघांचा सहभाग आहे. आयसीसीच्या 12 कसोटी खेळणाऱ्या देशांव्यतिरिक्त नेदरलँडचा संघही त्याचा भाग आहे. नेदरलँड्सने क्रिकेट सुपर लीग 2015-17 जिंकून या लीगमध्ये प्रवेश केला आहे. आता या 13 संघांपैकी भारत आणि सुपर लीगचे पहिले सात संघ थेट विश्वचषकात प्रवेश करतील. त्याचवेळी उर्वरित पाच संघांना संघर्ष करावा लागू शकतो.


सध्या पहिल्या सात संघांमध्ये न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश नाही. येत्या सामन्यांमध्ये या संघांनी चांगली कामगिरी केली नाही तर त्यांना सहयोगी देशांसोबत पात्रता फेरी खेळावी लागू शकते. जिथून अव्वल दोन संघांना विश्वचषकात स्थान मिळेल. हे तीन संघ पात्रता फेरी खेळले तर एक संघ बाद होईल. येथे, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड पाकिस्तानला विश्वचषकातून बाहेर काढण्यासाठी चांगली कामगिरी करू शकतात.


सुपर लीगमध्ये बांगलादेशचा संघ पहिल्या तर इंग्लंड दुसऱ्या स्थानावर आहे. अफगाणिस्तान तिसऱ्या आणि वेस्ट इंडिज चौथ्या स्थानावर आहे. भारत पाचव्या तर ऑस्ट्रेलिया सहाव्या स्थानावर आहे. या सर्व संघांचे थेट विश्वचषकात पात्र ठरणे जवळपास निश्चित आहे. त्याचवेळी नवव्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंड आणि दहाव्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानला अडचणीचा सामना करावा लागू शकतो. अकराव्या क्रमांकावर असलेला दक्षिण आफ्रिकाही संकटात सापडला आहे.