Champions Trophy 2025: आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) स्पर्धा पाकिस्तानात (Pakistan) खेळण्याचा प्रस्ताव आहे. 19 फेब्रुवारी ते 9 मार्चदरम्यान चॅम्पिअन्स ट्रॉफी खेळली जाणार आहे. स्पर्धा पाकिस्तानमध्ये होत असल्याने भारतीय संघ चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानचा दौरा करणार की नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सुरक्षा आणि ताणलेल्या राजकीय संबंधांच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ पाकिस्तानात जाण्याची शक्यता कमीच असून बीसीसीआयने (BCCI) तसे संकेत दिले आहेत. पण अद्याप भारत सरकारने यासंबंधी अधिकृत घोषणा केलेली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत जर चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात गेला नाही तर हायब्रीड मॉडेलनुसार आयोजन केलं जाईल. पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आपल्या देशातच स्पर्धा खेळवायची आहे. पाकिस्तान मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पीसीही चॅम्पिअन्स ट्रॉफी पाकिस्तानात आयोजित करण्यावरुन मागे हटण्याच्या भूमिकेत नाही. या आठवड्यात श्रीलंकेत होणाऱ्या आयसीसी बैठकीत बोर्ड आपल्या भूमिकेवर ठाम राहील. 


टी-20 वर्ल्डकपवर बहिष्कार टाकणार


19 ते 22 जुलै दरम्यान आयसीसी बोर्डाची बैठक होणार आहे. कोलंबोत होणाऱ्या या बैठकीत पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नकवी भाग घेऊ शकतात. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, जर भारताने चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात येण्यास नकार दिला तर आम्ही 2026 मध्ये होणाऱ्या वर्ल्डकपवर बहिष्कार टाकू. टी-20 वर्ल्डकप 2026 भारत आणि श्रीलंकेमध्ये खेळवला जाणार आहे. 


भारताने गतवर्षी झालेल्या आशिया कपमध्येही पाकिस्तानात जाण्यास नकार दिला होता. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला हायब्रीड मॉडेल स्विकारावं लागलं होतं. त्यामुळे आता पाकिस्तानला आशिया कप 2023 प्रमाणे ही स्पर्धाही हायब्रीॉ मॉडेलनुसार खेळवावी लागेल याची भीती वाटत आहे. जर भारत संघ पाकिस्तानात गेला नाही तर चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचे सामने युएई किंवा श्रीलंकेत खेळवले जाऊ शकतात. 


आयसीसीच्या बैठकीत यावर मोठी चर्चा होऊ शकते. यावेळी प्रत्येक सदस्य यावर वोटिंग करु शखतं. पण जर सदस्य दशातील सरकारची तिथे खेळण्याची इच्छा नसेल तर आयसीसीला पर्याय शोधावा लागेल. गतवर्षी आशिया कपदरम्यान बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला पाकिस्तानात गेले होते. 


पीसीबीने चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक तयार केले असून ते आयसीसी आणि सदस्य देशांकडे मंजुरीसाठी पाठवले आहे. सर्वांकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर ते सार्वजनिक कऱण्यात येणार आहे. त्याआधीच हे वेळापत्रक व्हायरल झाले. त्यानुसार चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची सुरुवात कराचीमध्ये 19 फेब्रुवारीपासून होणार आहे. सलामीचा सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. तसंच वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवण्यात आलं आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 1 मार्च रोजी लाहोरमध्ये होणार आहे. भारताचे सर्व सामने लाहोरमध्ये ठेवण्यात आले आहेत.


भारताने या दौऱ्याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. एका सूत्रानुसार, टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाण्याची शक्यता फार कमी आहे, परंतु अंतिम निर्णय सरकार घेईल. भारतीय संघाने शेवटचा पाकिस्तान दौरा 2008 मध्ये केला होता. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पाकिस्तान दौऱ्यात आशिया कप खेळला. तेव्हा टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली जिथे श्रीलंकेकडून 100 धावांनी पराभव पत्करावा लागला.