`बाळा जरा शांत हो...`, पाकिस्तानच्या स्टार खेळाडूने कोहलीला पाठवला होता मेसेज; सहकाऱ्याचा मोठा खुलासा
आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विराट कोहली आणि लखनऊ सुपर जायंट्सचा नवीन उल-हक भिडले होते. त्यांच्यातील या भांडणात लखनऊचा मेंटॉर गौतम गंभीरनेही उडी घेतली होती.
आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विराट कोहली आणि लखनऊ सुपर जायंट्सचा नवीन उल-हक यांच्यात झालेला वाद चांगलाच गाजला होता. विराट कोहली आणि नवीन उल-हक यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली होती. सामना संपल्यानंतरही त्यांच्यातील वाद मिटला नव्हता, याउलट तो वाढला होता. लखनऊचा मेंटॉर गौतम गंभीरनेही या भांडणात उडी घेतली होती. दरम्यान वर्ल्डकपमध्ये भारत-अफगाणिस्तान सामन्यात पुन्हा एकदा विराट आणि नवीन आमने-सामने आले होते. पण यावेळी दोन्ही खेळाडूंनी आपापसातील वाद मिटवत एकमेकांची गळाभेट घेतली होती. त्यांचे हे फोटो व्हायरल झाले होते.
दरम्यान पाकिस्तान क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू इमाम-उल-हकने एका पॉडकास्टदरम्यान खुलासा केला आहे की, विराट कोहली आणि नवीन उल-हकमध्ये झालेल्या वादानंतर आगा अली सलमान याने इंस्टाग्रामवर भारताच्या स्टार खेळाडूसाठी मेसेज पाठवला होता.
"ते भांडण फार व्हायरल झालं होतं. त्या भांडणानंतर आगा अली सलमानने विराट कोहलीला इंस्टाग्रामवर कोहली 'बाळा जरा शांत हो, काय झालं आहे' असा मेसेज पाठवला होता," असा खुलासा इमामने केला आहे.
दरम्यान या भांडणाबद्दल बोलायचं झाल्यास नवीन उल-हकने लखनऊ सुपरजायंट्सला दिलेल्या मुलाखतीत विराट कोहली आणि त्याच्यातील भांडण कसं मिटलं याचा खुलासा केला होता. "तो म्हणाला, हे भांडण संपवूयात का? मी पण म्हणालो हो संपवूयात. यानंतर आम्ही दोघं हसलो आणि एकमेकांना मिठ्या मारल्या. तो म्हणाला यानंतर तू माझं नाव ऐकणार नाहीस. तुला प्रेक्षकांकडून फक्त समर्थन मिळेल. मी पण हो म्हणत हसलो," असा खुलासा नवीन-उल-हकने केला होता.
नवीन उल-हकने यावेळी अफगाणिस्तान संघाला भारतीय प्रेक्षकांकडून फार चांगला प्रतिसाद मिळाल्याचं सांगत आम्हाला घरी खेळत आहोत असा अनुभव मिळाल्याची भावना व्यक्त केली होती. "फक्त भारताविरोधातील सामना वगळता आम्हाला प्रत्येक सामन्यात पाठिंबा मिळाला. आम्हाला येथे खेळताना घरच्या मैदानावर खेळत आहोत असं वाटत होतं," असं तो म्हणाला होता.
विराट कोहलीच्या आवाहनानंतर प्रेक्षकांचा यु-टर्न
विराट कोहलीने प्रेक्षकांना आवाहन करण्याआधी ते नवीन उल-हकला फार चिडवत होते. पण विराटने आवाहन केल्यानंतर प्रेक्षकांनी त्याला चिअर करण्यास सुरुवात केली होती. इंग्लंडविरोधातील सामन्यात प्रेक्षकांनी संपूर्ण सामन्यादरम्या नवीनला पाठिंबा दिला. या सामन्यात अफगाणिस्तानने इंग्लंडचा 69 धावांनी पराभव करत सर्वांना धक्का दिला होता.