नवी दिल्ली : भारताविरुद्धच्या पराभवामुळे पाकिस्तानात आता धुमशान सुरु आहे. या पराभवानंतर पाकिस्तानी चाहत्यांनी पाकिस्तानी संघाला चांगलंच धारेवर धरलं आहे. समाज माध्यामांद्वारे पाक चाहते आपला राग व्यक्त करत आहेत. पाकिस्तानी क्रिकेट चाहते आपल्याच संघावर चांगलेच तुटून पडले आहेत. पाकिस्तानी संघानं भारताविरुद्ध खराब कामगिरी तर केलीच. याखेरीज भारताला साधा प्रतिकार करण्याची देखील त्यांची मानसिकता नव्हती. ही त्यांची देहबोली सांगत होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संघाचा कर्णधारच मैदानावर जांभई देत असेल तर तो संघात काय ऊर्जा निर्माण करणार? सर्फराजचा जांभई देणारा फोटो समाज माध्यमांवर चांगलाच ट्रोल झाला असून पाकचाहत्यांनी सर्फराजवर टीकेची झोड उठवली आहे.


दुसरीकडे शून्यावर बाद होणारा शोएब मलिक आणि इमाम उल हक हे सामन्यापूर्वी एका हुक्का पार्लरमध्ये मौजमजा करत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी या पराभवाला खेळाडूंच्या मौजमजेलाही जबाबदार धरलं आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओ शोएब मलिकची पत्नी आणि भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा देखील दिसत आहे. 


नाणेफेक जिंकल्यास सर्फराज अहमदनं प्रथम फलंदाजी घ्यावी, असा सल्ला पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी विश्वविजेते क्रिकेट कर्णधार इम्रान खान यांनी दिला होता. सामना सुरू होण्यापूर्वी धावपट्टी कोरडी असेल तर सर्फराजनं आक्रमकता दाखवावी, अशी खान यांची अपेक्षा होती. मात्र त्यानं हा सल्ला धुडकावला आणि नाणेफेक जिंकुनही प्रथम गोलंदाजी घेतली. त्यानंतर काय घडलं, ते तुमच्या समोर आहे. 


इम्रान खान यांचा सल्ला पंतप्रधानाचा म्हणून नव्हे, तर माजी क्रिकेटपटू म्हणून तरी स्वीकारला असता तर कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं.