मुंबई : पाकिस्तानी क्रिकेटपटूंचा धर्मांध चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. यावेळी तर खुद्द शोएब अख्तरनेच याबाबतचा गौप्यस्फोट केला आहे. दानिश कनेरिया हा हिंदू असल्यामुळे त्याला पाकिस्तानी क्रिकेटपटूंकडून त्रास देण्यात आला असं वक्तव्य शोएब अख्तरने केलं. दानिश कनेरियानेदेखील अख्तरच्या या वक्तव्याला दुजोरा दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सगळ्या घटनाक्रमातलं सत्य आपण आता जगाला सांगणार आहोत. मी हिंदू असल्यानं टीममधले अनेक खेळाडू माझ्याशी बोलायचे देखील नाहीत. सुरूवातीला याबाबत बोलण्याचं धैर्य माझ्यात नव्हतं. मात्र आता त्या खेळाडूंची नावं आपण जाहीर करणार आहोत, अशी प्रतिक्रिया कनेरियानं व्यक्त केलीय.


दानिश कनेरिया हिंदू होता म्हणून त्याच्यावर अन्याय झाला. काही खेळाडूंना तर तो आमच्यासोबत का जेवतो? असाही आक्षेप होता, असं वक्तव्य शोएब अख्तरने एका टीव्ही शोदरम्यान केलं आहे.


या गोष्टीवरून माझं दोन-तीन खेळाडूंशी भांडण झालं. जर कोणी हिंदू असेल तर तोपण खेळेल. त्याच हिंदू असलेल्याने आम्हाला टेस्ट सीरिज जिंकवली. तो इकडून जेवण का घेतोय? असा प्रश्न एका खेळाडूने विचारला. तेव्हा तुला इकडून बाहेर फेकून देईन, असं मी त्याला ऐकवलं. कर्णधार असशील तु तुझ्या घरातला. तो तुम्हाला ६-६ विकेट घेऊन देतोय. इंग्लंडमध्ये दानिश आणि शमीने आम्हाला सीरिज जिंकवून दिली होती, असं शोएब अख्तर म्हणाला.


पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि त्यांच्या धर्मांधतेचं हे काही पहिलं उदाहरण नाही. याआधीही अनेक क्रिकेटपटूंना याचा प्रत्यय आला आहे.


युसुफ योहाना ते मोहम्मद युसुफ


शोएब अख्तरने ज्या कार्यक्रमात दानिश कनेरियाबाबत वक्तव्य केलं त्याच कार्यक्रमात राशीद लतीफ यांनी मोहम्मद युसुफबाबतचा किस्साही सांगितला. युसुफ योहाना कमालीचा खेळाडू होता, पण त्याला त्रास देण्यात आला. अखेर त्याने धर्म बदलला, असं राशिद लतीफ म्हणाला. युसुफच्या नावावर १२ हजार रन आहेत, पण आपण त्याला योग्य सन्मान दिला नाही, अशी प्रतिक्रिया शोएब अख्तरने दिली.


सुरुवातीच्या काळात ख्रिश्चन असणाऱ्या युसुफ योहानाने धर्मांतर करून इस्लाम धर्म स्वीकारला. यानंतर पुढची आंतरराष्ट्रीय कारकिर्द तो मोहम्मद युसुफ या नावाने खेळला.


मोहम्मद युसुफने धर्मांतर केल्यानंतर त्याच्या कुटुंबाने याबाबत नाराजी व्यक्त केली होती. पाकिस्तानमधल्या स्थानिक मशिदीत शुक्रवारचा नमाज पठण केल्यानंतर आम्हाला युसुफने धर्मांतर केल्याचं कळलं. आमच्यासाठी त्याचा हा निर्णय धक्कादायक होता. याच्यापुढे युसुफने माझं नावही लावू नये, असं त्याची आई म्हणाल्याचं वृत्त त्यावेळी पाकिस्तानी माध्यमांनी दिलं होतं.


युसुफच्या आईने ही संतप्त प्रतिक्रिया दिली होती, तरी युसुफने मात्र आपण स्वेच्छेने धर्मांतर केल्याचं सांगितलं होतं. 'पाकिस्तानमधली धार्मिक संस्था असलेल्या तबलिघी जमातची व्याख्यानांना उपस्थिती लावल्यानंतर मी हा निर्णय घेतला', असं युसुफ म्हणाला होता. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सईद अन्वर या संस्थेचा सदस्य होता. तबलिघी जमात या संस्थेचे सदस्य कित्येक वर्षांपासून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं कार्यालय आणि पाकिस्तानी टीमच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये येतात, असं त्यावेळी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं.


अहमद शहजाद आणि तिलकरत्ने दिलशान


२०१४ साली पाकिस्तान आणि श्रीलंकेमध्ये झालेल्या मॅचवेळीही मोठा वाद झाला होता. पाकिस्तानचा क्रिकेटपटू अहमद शहजाद याने तिलकरत्ने दिलशानबाबत धार्मिक टिप्पणी केली होती. 'जर मुस्लिम नसशील आणि मुस्लिम झालास तर तू काहीही केलंस तरी जन्नतमध्ये जाशील,' असं शहजाद दिलशानला म्हणाला होता. शहजादचं हे बोलणं कॅमेरात कैद झालं होतं.


अहमद शहजादच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याची चौकशीही केली होती. पण आमच्या दोघांमधलं ते वैयक्तिक संभाषण होतं, अशी सारवासारव अहमद शहजादने केली होती. श्रीलंकेच्या बोर्डाकडून याबाबत तक्रार करण्यात आली नाही, तरी आम्ही याची चौकशी करत असल्याचं स्पष्टीकरण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिलं होतं.


तिलकरत्ने दिलशानचे वडिल मुस्लिम आणि आई बौद्ध आहे. दिलशानचं नाव तुवान मोहम्मद दिलशान होतं, पण १९९९ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर त्याने तिलकरत्ने मुदियानसेलगे दिलशान हे नाव ठेवलं. दिलशानचं नाव हे मुस्लिम असलं, तरी तो आणि त्याचे बहिण-भाऊ लहानपणीपासून आईच्या धर्माचं अनुकरण करतात, असं दिलशानचे लहानपणीचे प्रशिक्षक रंजन प्रणवैतेना सांगतात.


मोहम्मद शमीवरही निशाणा


२०१९ वर्ल्ड कप दरम्यान पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू अब्दुल रझाक आणि सिकंदर बख्त यांनीही मोहम्मद शमीच्या धर्मावर टिप्पणी केली होती. मोहम्मद शमी हा भारताकडून खेळत असला तरी तो मुस्लिम आहे, ही चांगली गोष्ट आहे, असं अब्दुल रझाक एका कार्यक्रमात म्हणाला होता.


भारताकडे सर्वोत्तम बॉलिंग आक्रमण आहे. बुमराह एक नंबर बॉलर आहे, पण त्याला विकेट घेता येत नाहीयेत. चहललाही विकेट मिळत नाहीयेत. शमीने त्याचं काम केलं आहे. तो मुस्लिम आहे, ही चांगली गोष्ट आहे, असं वक्तव्य सिकंदर बख्त यांनी वर्ल्ड कपदरम्यान केलं होतं.