अंगावर पेट्रोल ओतून घेत क्रिकेटपटूने केला आत्महत्येचा प्रयत्न
क्रिकेटचा सामना सुरू असताना एका युवा खेळाडूने मैदानावरच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना पाकिस्तानातील लाहोर येथील सिटी क्रिकेट असोसिएशनच्या (एलसीसीए) मैदानात घडली.
लाहोर : क्रिकेटचा सामना सुरू असताना एका युवा खेळाडूने मैदानावरच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना पाकिस्तानातील लाहोर येथील सिटी क्रिकेट असोसिएशनच्या (एलसीसीए) मैदानात घडली.
गुलाम हैदर अब्बास असे या खेळाडूचे नाव आहे. संघात न झालेली निवड आणि निवड समितीकडून मिळणारी पोकळ अश्वासने यामुळे आपण हे पाऊल उचलल्याचे गुलाम हैदरनेम्हटले आहे. प्राप्त माहितीनुसार, कायदे-आजम ट्रॉफीतील सामना सुरू असताना गुलाम हैदर मैदानात गेला आणि त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, त्याचे हे कृत्य पाहून, उपस्थितांनी वेळीच त्याला रोखले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
दरम्यान, निवड समितीने संघात निवड न केल्याने आपल्याला पुढील आयुष्यात प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्याची संधी मिळणार नाही ही भावना गुलाम हैदरच्या मनात होती. त्यातूनच त्याने आपल्याला ही संधी मिळावी. आपल्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास गद्दाफी स्टेडिअमच्या प्रवेशद्वारावर आत्महत्या करु, असा इशारा त्याने दिला होता.
तसेच, एलसीसीआय गुणवत्तेच्या जोरावर खेळाडूंची निवड करत नाही. संधीच्या बाबतीत ते खेळाडूंना लाच मागतात. आपल्यासोबतही हा प्रकार घडला होता, असा आरोप करत आपल्या आत्महत्येला एलसीसीआय जबाबदार असेल असेही गुलाम हैदरने आपल्या इशाऱ्यात म्हटले होते.