मुंबई : श्रीलंकेविरूद्धचा पहिला टेस्ट सामना टीम इंडियाने अवघ्या 3 दिवसांतच जिंकला. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया चांगली कामगिरी करतेय. याा सामन्यात टीममधील गोलंदाजांच्या कामगिरीचंही कौतुक होतंय. भारताचा स्पिनर रविचंद्रन अश्विनने टेस्टमध्ये सर्वाधिक विकेट्समध्ये कपिल देव यांनाही मागे टाकलंय. यावरून रोहित शर्माने अश्विनचं कौतुक केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामन्यानंतर बोलताना रोहित शर्माने रविचंद्रन अश्विनला त्याने ऑल टाइम ग्रेट प्लेयर असं म्हणूनही संबोधलं. मात्र रोहितचं हे वक्तव्य पाकिस्तानी खेळाडूंना रूचलं नाहीये. यानंतर पाकिस्तानचे माजी कर्णधार राशिद लतीफ यांनी नाराजी व्यक्त केली आहे.


लतीफ यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवरून यावर नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, अश्विन चांगला गोलंदाज आहे यात शंका नाही. घरच्या मैदानावर अश्विनची कामगिरी पाहिली तर तो भारतातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज आहे. मात्र परदेशातील मैदानांवर त्याचा खेळ तितका परिपूर्ण नाही. त्यामुळे मी रोहित शर्माशी सहमत नाही. कदाचित रोहित शर्माची जीभ घसरली असावी. खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा हा एक मार्ग आहे."


अश्विनच्या नावावर मोठा विक्रम


भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत रविचंद्रन अश्विन दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात चरिथ असलंकाची विकेट घेत अश्विनने कपिल देवचा विक्रम मोडला. 


अश्विनने आपल्या कसोटी क्रिकेटमध्ये 435 विकेट घेतल्या आहेत. भारताचा महान गोलंदाज अनिल कुंबळे अश्विनच्या पुढे आहे, कुंबळेच्या नावावर 619 कसोटी विकेट आहेत.