पाकिस्तानचे दिग्गज अम्पायर अलीम डार (Aleem Dar) यांचं नाव जगातील सर्वोत्कृष्ट अम्पायर्समध्ये घेतलं जातं. अलीम डार यांच्या नावे सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अंपायरिंग करण्याचा रेकॉर्ड आहे. अलीम डार यांनी आपल्या करिअरमध्ये 145 कसोटी, 231 एकदिवसीय आणि 72 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अम्पायरिंग केली आहे. अलीम डार मैदानात असताना खेळाडूही त्यांच्या निर्णयांना आव्हान देताना विचार करत असत. दरम्यान अलीम डार यांनी आपल्या आयुष्यातील सर्वात वाईट क्षणाचा खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीम डार यांनी सांगितलं आहे की, 2003 मध्ये आंतरराष्ट्रीय करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात पत्नी आणि कुटुंबातील सदस्यांनी 7 महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाल्याची बातमी आपल्यापासून लपवली होती. अलीम डार यांनी पाकिस्तानमधील चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, 2003 वर्ल्डकपदरम्यान आपण अंपायरिंग करत असताना पत्नी आणि कुटुंबाने नवजात मुलीचा मृत्यू झाल्याचं सांगितलं नव्हतं. 


56 वर्षीय अलीम डार म्हणाले की, "आयसीसी पॅनल अम्पायर म्हणून ही माझ्या करिअरची सुरुवात होती. माझ्या करिअरसाठी ही फार महत्वाची स्पर्धा होती. त्यांना माहिती होतं की, जर मला मुलीच्या मृत्यूबद्दल समजलं तर मी लगेच घरी परत येईन". जेव्हा आपल्याला मुलीच्या मृत्यूबद्दल समजलं तेव्हा तो आपल्या आयुष्यातील सर्वात वाईट क्षण होता आणि फार वाईट वाटलं असंही ते म्हणाले. 


'मला अंधारात ठेवण्यात आलं'


अलीम डार यांनी सांगितलं की, "मुलीच्या मृत्यूनंतर जवळपास एक महिना मला अंधारात ठेवण्यात आलं. जोहान्सबर्ग येथे मला पाकिस्तानमधील एका व्यक्तीने शोक व्यक्त करण्यासाठी फोन केला असता मला याबद्दल समजलं. त्यावेळी मला मोठा धक्का बसला. मी तात्काळ आयसीसीला कळवलं आणि घरी परतलो".


अलीम डार यांनी सांगितलं की, मुलीच्या मृत्यूबद्दल समजल्यानंतर मी पत्नीला फोन केला असता ती रडू लागली. नंतर मला समजलं की, माझ्या वडिलांनी मीडियामधील मित्रांना ही बातमी छापू नका असं सांगितलं होतं.