इस्लामाबाद : पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. निधी मागण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान चीनला गेले होते. पाकिस्तानची आर्थिक स्थिती एवढी वाईट आहे की त्यांच्या हॉकी टीमला वर्ल्ड कपला पाठवण्यासाठीही पैसे नाहीयेत. हॉकी वर्ल्ड कप २८ नोव्हेंबरपासून भुवनेश्वरमध्ये खेळवण्यात येणार आहे. २८ नोव्हेंबर ते १६ डिसेंबरपर्यंत वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. भारत आणि पाकिस्तानमधले संबंध आधीपासूनच खराब आहेत, त्यामुळे या स्पर्धेत पाकिस्तान सहभागी होणार नाही, असंच दिसतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॉकी टीमला वर्ल्ड कपला पाठवण्यासाठी पैसे नाहीत. याआधी पाकिस्तान हॉकी फेडरेशननं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे मदत मागितली होती. पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आर्थिक परिस्थितीही फारशी चांगली नाही. त्यामुळे त्यांनीही मदत करायला नकार दिला.


पाकिस्तान हॉकी फेडरेशननं वारंवार पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे ८.२ कोटी रुपये मागितले होते. पण पाकिस्तान सरकारकडून याबाबत अजून कोणतंही उत्तर आलं नाही. त्यामुळे पाकिस्तानची टीम वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार का नाही याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


पाकिस्तानमध्ये हॉकीची अवस्था अत्यंत बिकट आहे. हॉकीचे खेळाडू देशाचे हिरो होते, हे पाकिस्तानी लोकं विसरली आहेत, असं वक्तव्य पाकिस्तानी हॉकी टीमचे प्रमुख प्रशिक्षक तौकीर डार यांनी केलं आहे.