`माझ्यामुळे गंभीरची कारकिर्द संपली`; या क्रिकेटपटूचा दावा
क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर राजकारणात प्रवेश केलेल्या गौतम गंभीरला तिकडेही पहिल्याच इनिंगमध्ये यश मिळालं.
मुंबई : क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर राजकारणात प्रवेश केलेल्या गौतम गंभीरला तिकडेही पहिल्याच इनिंगमध्ये यश मिळालं. लोकसभा निवडणुकीत गंभीर भाजपच्या तिकीटावर विजयी झाला. २०१८ साली गंभीरने क्रिकेटच्या सगळ्या प्रकारामधून निवृत्ती घेतली. २०१६ साली गंभीरने इंग्लंडविरुद्ध शेवटची टेस्ट खेळली, तर २०१३ साली गंभीर शेवटची वनडे खेळला. गौतम गंभीरची कारकिर्द आपल्यामुळे संपल्याचा दावा पाकिस्तानचा क्रिकेटपटू मोहम्मद इरफानने केला आहे.
'गौतम गंभीर मला घाबरायचा. माझ्यामुळे त्याची कारकिर्द संपुष्टात आली. त्यानंतर गंभीरने टीममध्ये पुनरागमन केलं नाही,' असं इरफान म्हणाला आहे. २०१२ साली इरफानने गंभीरला ४ वेळा आऊट केलं होतं.
भारत आणि पाकिस्तानमधल्या ३ वनडे मॅचच्या सीरिजमध्ये इरफानने २ वेळा गंभीरची विकेट घेतली. याचवर्षी गंभीर त्याची शेवटची टी-२० मॅच खेळला. या सीरिजनंतर गंभीर टीम इंडियाकडून फक्त एकच वनडे मॅच (इंग्लंडविरुद्ध) खेळू शकला. यापुढे गंभीरला टीम इंडियामध्ये पुनरागमन करता आलं नाही.
'गंभीरला मॅचमध्ये माझ्याविरुद्ध खेळायला आवडायचं नाही. गंभीर माझ्या डोळ्यात डोळेही घालायचा नाही. २०१२ सालच्या सीरिजमध्ये मी गंभीरला ४ वेळा आऊट केलं, हे मला आठवतंय,' असं वक्तव्य इरफानने केलं आहे.
'माझ्या उंचीमुळे भारतीय बॅट्समनना बॉलही दिसायचा नाही. विराट कोहलीलाही माझ्याविरुद्ध खेळताना अडचण यायची. मी १३५ किमी प्रती तासाने बॉलिंग टाकेन, असं विराटला वाटत होतं, पण मी माझी गती वाढवली आणि १४५ किमी प्रती तासाने बॉलिंग टाकली, यामुळे विराटला माझ्याविरुद्ध खेळताना अडचण आली,' असा दावा इरफानने केला आहे.
गंभीरने भारताकडून ७८ टेस्ट, १४७ वनडे आणि ३७ टी-२० मॅच खेळल्या आहेत. तर इरफानने पाकिस्तानकडून ६० वनडे मॅच खेळल्या. २०१६ साली इरफान पाकिस्तानकडून शेवटची मॅच खेळला.